मुंबई | Mumbai
आतुरतेने वाट पाहत असलेल्या आयपीएल स्पर्धेचा सलामी सामना ४ वेळचा विजेता मुंबई इंडियन्स आणि ३ वेळचा विजेता चेन्नई सुपरकिंग्ज या दोन धमाकेदार संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे.
हा सामना अबूधाबीच्या शेख झायेद मैदानावर होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटनाच्या लढतीत विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात आतापर्यंत झालेल्या २८ लढतींमध्ये मुंबईने १७ वेळा बाजी मारली आहे. तर ११ वेळा चेन्नई संघाने विजय संपादन केला आहे. २०१४ भारतात निवडणुका असल्यामुळे आयपीएलचे आयोजन यूएईत करण्यात आले होते. येथे झालेल्या ५ सामन्यांमध्ये मुंबईला ५ पराभवांचा सामना करावा लागला होता.
चेन्नई संघ मुंबई संघाच्या तुलनेत काहीसा दुबळा दिसत आहे. कारण स्टार फलंदाज सुरेश रैना आणि हरभजनसिंग या दोन हुकमी एक्क्यांनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. तसेच गोलंदाज दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.
अशातच नंबर ३ वर कोण? सलामीला कोण उतरणार, अंतिम ११ खेळाडू कोण असे अनेक प्रश्न चेन्नई संघाला भेडसावत आहेत. दुसरीकडे लसिथ मलिंगाने आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याच्याजागी जेम्स पॅटिन्सन याला संधी देण्यात आली आहे.
मुंबई संघाच्या फलंदाजीची मदार क्रिस लिन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्विंटन डिकॉक, आदित्य तारे, ईशान किशन यांच्यावर आहे.
तर अष्टपैलूंमध्ये कृणाल पंड्या , हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड, आहेत. गोलंदाजीत नेथन कुल्तेरनैल, जसप्रीत बुमरा, राहुल चहर, मिचेल मॅक्लेनघन, जेम्स पॅटिन्सन आहेत.
चेन्नई संघाच्या फलंदाजीची मदार आंबटी रायडू , मुरली विजय, फाफ डू प्लेसिस, एमएस धोनी, केदार जाधव नारायण जगदीशन यांच्यावर असणार आहे. अष्टपैलूंमध्ये डीजे ब्रावो, शेन वॉटसन, मिचेल संतनेर, सॅम करण आहेत. गोलंदाजीत पियुष चावला , रविंद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, के एम असिफ, मोनू कुमार, जोश हेझलवूड , लुंगी इंगिडी आहेत.
– सलिल परांजपे, नाशिक