Friday, June 14, 2024
HomeUncategorizedहृदयात 'मेक इन इंडिया' वॉल बसविण्याची मराठवाड्यातील पहिली शस्त्रक्रिया

हृदयात ‘मेक इन इंडिया’ वॉल बसविण्याची मराठवाड्यातील पहिली शस्त्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर- Chhatrapati Sambhajinagar

- Advertisement -

हृदयातील अवॉटीक वॉल किंवा महाधमणीचा आकार लहान झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी शस्त्रक्रिया द्वारे कृत्रिम वॉल बसविण्याचा एकमेव मार्ग राहतो. वृद्ध व अतिजोखमीच्या रुग्णांना या शस्त्रक्रिया धोक्याच्या ठरतात. शस्त्रक्रिया टाळली तर रुग्णाच्या जीवालाही धोका निर्माण होतो. अत्याधुनिक ट्रान्स कॅथेटर एव्हीआर तंत्रज्ञानाने शरीराची चिरफाड न करता वॉल बसवण्याची यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. हेडगेवार रुग्णालयात करण्यात आली. शस्त्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी वृद्ध रुग्णाची प्रकृती ठणठणीत झाली. चौथ्या दिवशी घरी जाण्याची परवानगी मिळाली. मेक इन इंडियाचा वॉल बसविण्याची मराठवाड्यातील ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली.

महाधमनीच्या झडपेचा आकार विशिष्ट वयानंतर कॅल्शीयमसारखे पदार्थ जमा होऊन लहान होतो. यामुळे रुग्णांना दम लागणे, छातीत दुखणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे यासारखे त्रास उद्भवतात. ८० टक्के रुग्णांचा वयामुळे तर २० टक्के रुग्णांचा वॉलच्या चुकीच्या रचनेमुळे किंवा अनुवांशिक कारणांमुळे आकार लहान होतो. अशावेळी वॉल बदलण्याशिवाय पर्याय राहत नाही. बायपास शस्त्रक्रियेद्वारे लहान किंवा घट्ट झालेल्या वॉलचे तोंड कापून त्या ठिकाणी कृत्रिम वॉल बसवावा लागतो.

बायपासमध्ये छाती उघडावी लागते. दीर्घकाळ व्हेंटीलेटरवर ठेवावे लागते. तसेच बरे होण्यासाठी किमान ८-१० दिवस लागतात. हीच आजवरची प्रचलित उपचार पद्धती आहे. मात्र, एका विशिष्ट वयानंतर ही शस्त्रक्रिया धोक्याची ठरते. त्यावर आता चिरफाड न करता वॉल प्रत्यारोपीत करणारे ट्रान्स कॅथेटर एव्हीआर तंत्रज्ञान उपयोगी ठरत असल्याची माहिती डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री रत्नपारखी, ह्रदयरोग विभागप्रमुख डॉ.महेश देशपांडे आणि भूलतज्ञ डॉ. रेणू चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यातील ६९ वर्षीय रुग्णावर शस्त्रक्रिया

पुण्यात राहणाऱ्या एका ६९ वर्षीय महिलेवर ८ एप्रिल रोजी हेडेगवार रुग्णालयात डॉ.महेश देशपांडे, डॉ.विनोद शेटकर आणि डॉ.यतींद्र अष्टपुत्रे यांनी टीएव्हीआर शस्त्रक्रिया केली. त्यांना हृदयरोगतज्ञ डॉ. भाग्यश्री आंधळकर, डॉ. स्वप्नील सांबापुरे यांनी सहकार्य केले. तर डॉ. रेणू चव्हाण आणि डॉ. अश्विनी अष्टपुत्रे यांनी शस्त्रक्रियेदरम्यान भूल दिली. तिसऱ्याच दिवशी त्यांना बरे वाटू लागते आणि चौथ्या दिवशी त्यांना डिस्चार्जही मिळाला.

नेमके काय होते वॉलला

डॉ.महेश देशपांडे म्हणाले, शरीरातील पेशी जुन्या होत गेल्याने त्यात कॅल्शीयम जमा होते. महाधमणीचे व्हॉल्ववर ३ पाखे असतात. कॅल्शीयम जमल्याने त्यांची हालचाल मंदावते. ते उघडझाप करत नाहीत. यामुळे रक्त वाहण्याची प्रकिया मंदावते.

चिरफाडीशिवाय शस्त्रक्रिया

नवीन तंत्रज्ञानात हृदयाची चिरफाड न करता पायाच्या धमनीतून वॉल महाधमणीच्या झडपेवर बसविला जातो. चिरफाड नसल्याने वृद्ध व अतीजोखमीच्या रुग्णांनाही ही शस्त्रकिया उपयोगी ठरते. रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवण्याची आवश्यकता भासत नाही. तसेच ३ ते ४ दिवसात घरी जाता येते. बायपासमध्ये ६ ते ८ टक्के तर या प्रकारात १ ते १.५ टक्के मृत्युदर राहतो.

मेक इन इंडिया वॉल

आजवर परदेशी बनावटीचे वॉल बसविण्याची शस्त्रक्र्रिया करण्यात आल्या आहेत. मात्र, भारतीय बनावटीचे वॉल बसविण्याची मराठवाड्यातील पहिली शस्त्रक्रिया हेडगेवार रुग्णालयात करण्यात आली. हा वॉल प्राण्यांच्या पेशीपासून तयार करण्यात आल्याने शस्त्रक्रियेनंतर रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेण्याची आवश्यकता भासत नाही. यासाठी १६ ते १७ लाख रुपये खर्च आला. यात १२ ते १३ लाख रुपये वॉलची किंमत आहे. सध्या केंद्राच्या आरोग्य योजनेत या शस्त्रक्रियेचा समावेश आहे. माजी सैनिकांनाही योजनेचा लाभ मिळतो. राज्याच्या मुख्यमंत्री वैद्यकीय किंवा महात्मा फुले योजनेत याचा समावेश झालेला नाही.

सद्या ही उपचार पद्धती केवळ अती जोखमीच्या किंवा वृद्ध रूग्णांसाठी उपलब्ध आहे. यामुळे केवळ वयामुळे ज्यांना उपचार घेता येत नव्हते त्यांचे प्राणही वाचतील. भविष्यात ही उपचार पद्धती सामान्य होईल, असा विश्वास वाटतो.

– डॉ.महेश देशपांडे, हृदयरोगतज्ञ, डॉ.हेडगेवार रुग्णालय

- Advertisment -

ताज्या बातम्या