राहाता |वार्ताहर| Rahata
नगरपरिषदेच्या साठवण तलावात पाण्याने तळ गाठल्यामळे हजारो मासे मृत झाल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली होती. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी कर्मचार्यांच्या मदतीने मृत झालेले मासे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन दिवसात ही मोहीम पूर्ण होईल मात्र कर्मचार्यांच्या मदतीला आजी-माजी नगरसेवक आले नसल्यामुळे कर्मचार्यांनी तसेच नागरिकांनी खंत व्यक्त केली.
नगर परिषदेच्या पाणी साठवण तलावाने मे महिन्यातच तळ गाठला. गोदावरी कालव्यातून 11 मे रोजी पिण्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आल्यानंतर राहाता नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जलसंपदा विभागाची लेखी पत्रादारे संपर्क करून साठवण तलावात पाणी सोडण्याबाबत पत्रावर केला होता. परंतु चितळी गावापासून पाणी साठवण तलाव क्रमशः पाणी सोडत आल्यानंतरच राहाता साठवण तलावात पाणी सोडण्यात येईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. नगरपरिषदेच्या मालकीचे कुपनलिका व विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. नगरपरिषदेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख अशोक साठे व शहरातील नागरिकांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शहराची पिण्याची पाणी समस्या बाबत माहिती दिली. त्यानंतर विखे पाटील यांनी तात्काळ पाणी सोडण्यात सूचना दिल्यानंतर सोमवारी साठवण तलावात पाणी सोडले.
परंतु या तलावात पाणी वेळेत न सोडल्यामुळे हजारो मासे मृत झाले. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने रविवारी मृत मासे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु तळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने कर्मचारी गाळात फसू लागले. कुठलाही धोका नको म्हणून तळ्यात पाणी आल्यानंतर मंगळवारी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्यांनी अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांची मदत घेऊन मृत मासे बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेतली. दोन दिवसात तळ्यातील सर्व मृत मासे बाहेर काढले जातील.
साठवण तलावाला कुंपण भिंत नसल्यामुळे या तलावात नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकतात. तलावाच्या कडेला रस्ता असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी या तलावात तरुण पाण्यात बुडाले होते परंतु काही नागरिकांच्या सतर्कमुळे त्यांना वाचवण्यात यश आले अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून नगरपरिषदेने तात्काळ या तलावाच्या कडेला रक्षक भिंत बांधावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.