Wednesday, December 4, 2024
Homeनगरमासेमारी करणार्‍या युवकाला सापडला 'हा' दुर्मिळ मासा

मासेमारी करणार्‍या युवकाला सापडला ‘हा’ दुर्मिळ मासा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील कमालपूर येथे गोदावरी नदीच्या जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरच्या पाण्यात मासेमारी करत असलेल्या युवकाच्या जाळ्यात औषधी गुणधर्म असलेला दुर्मिळ अहिर मासा सापडला आहे. हा मासा सुमारे साडेतीन फूट लांब व सव्वा पाच किलो वजनाचा आहे. येथील दीपक बर्डे यांच्या जाळ्यात हा दुर्मीळ मासा सापडला आहे. हा मासा पाण्याच्या तळाला रेती किंवा चिखलात राहतो. तोंडापासून शेपटीपर्यंत तो सतत चिकट स्राव सोडत असतो. त्यामुळे हातात येवूनही तो सहज निसटून पुन्हा पाण्यात जातो. असे असताना या युवकाने हा मासा शिताफीने पकडून नदीकाठावर आणला. त्याच्या अंगावरील चिकट द्रवसुध्दा औषधी असते.

- Advertisement -

दुर्मिळ असलेला अहिर मासा सुमारे सहा ते सात हजार रुपये किलोच्या भावाने विकला जातो. परदेशात त्यास मोठी मागणी असते.अहिर मासा सर्पासारखा लांब, जाडसर असतो. तोंड पुढच्या टोकाला, खालचा आणि वरचा ओठ थोडासा जाडसर, नाकाचा भाग अर्धवर्तुळाकार असतो. तोंडामध्ये त्रिकोणी आकाराचे दात एका ओळीत दिसतात. इतर माशांमध्ये जसे वेगवेगळे पर दिसतात, तसे याच्यात एकच पर पाठीपासून चालू होतो. तो शेपटीच्या परापर्यंत असा एकच होऊन जातो. शरीराच्या खालच्या बाजूला खांद्याजवळ छोटे पर असतात.

हा मासा पाण्याच्या बाहेरसुद्धा खूप वेळ जिवंत राहू शकतो. याच्या शरीरात हवेची पिशवी असते. पाण्याच्या बाहेर या पिशवीतील ऑक्सिजनचा वापर तो श्वसनासाठी करत असतो. पाण्याबाहेर काढल्यानंतर या माशाच्या त्वचेतून खूप स्राव स्रवत असतो. तो इतका बुळबुळीत असतो, की मासा हातातून कधी सटकतो ते कळतही नाही.हा मासा नीरा, भीमा, इंद्रायणी, घोड व मुळा या नद्यांच्या पात्रात प्रामुख्याने सापडतो.परंतु अलीकडच्या काळात हा मासा गोदावरी नदीत जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सापडू लागला आहे.काही काळापूर्वी नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम परिसरातील काही मासेमारी करणार्‍या युवकांनाही हा मासा सापडला होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या