नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक मनपाच्या वतीने येत्या काही दिवसांत शहरात पाच ठिकाणी नवीन ई-चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या या ई-स्टेशनचे प्रति युनिट दर खासगी चार्जिंग स्टेशनपेक्षा दहा ते तेरा रुपयांनी कमी राहणार आहे.
नाशिक शहरात तीन खासगी चार्जिंग स्टेशन आहेत. त्याचे दर 21 ते 29 रुपये प्रति युनिट असल्याचे मनपाने म्हटले आहे. त्या तुलनेत महापालिकेच्या ई-चार्जिंग स्टेशनवरील दर कमी आहे. मनपा इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन एक ते दीड आठवडयात कार्यन्वित होणार आहेत.
वाहन चार्जिंगसाठी साडेसोळा रुपये प्रति युनिट दर ठरवल्याने ई-वाहन वापरणार्यांची गर्दी होणार आहे. सध्या राजीव गांधी भवन येथे टेस्टींग म्हणून वाहनांना चार्ज केले जात असून तेथे वाहनधारकांची गर्दी होत आहे.
एक ते दीड वर्षापासून चार्जिंग स्टेशन सुरु करण्याचे प्रयत्न मनपाच्या यांत्रिकी विभागाकडून सुरु होते. नाशिक शहरातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनकॅप) योजनेअंतर्गत दहा कोटींच्या निधीतून शहरात वीस चार्जिंग स्टेशन उभारत आहे. पहिल्या टप्यात शहरातील वीस ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी ही सोय असेल.