कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव शहरात शनिवारी पहाटे माता रमाई जयंती निमित्त लावण्यात आलेला शुभेच्छा फलक अज्ञात इसमाने फाडल्याने तणाव निर्माण झाला होता. आक्रमक भीमसैनिकांनी नगर-मनमाड महामार्ग येथे रास्ता रोको आंदोलन केले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर महिलांनी ठिय्या मांडला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपाची चक्रे फिरवत एका संशयीत इसमाला ताब्यात घेतले आहे.
दोन दिवसात आरोपीला अटक झाली नाही तर मंगळवारपासून आंदोलनाचा इशारा भीम सैनिकांनी दिला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शी यांची मदत घेत वेगाने तपासाची चक्रे फिरवत एका संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे. ज्या संशयित इसमाला कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो इसम मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. त्याच्याकडे एक दांडा आणि एक चाकू आढळून आला आहे.
सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झालेली व्यक्ती तीच आहे का? याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी महिला आणि तरुणांना बोलावून खात्री केली. सदर तरुणांनी व महिलेने त्याला ओळखले मात्र सदर व्यक्ती तीच आहे का? याचा सखोल तपास तसेच अन्य कोणी यात सामील आहे का? याचा तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत.