नाशिक | प्रतिनिधी
फुलांची नगरी म्हणून नाशिक जगभर प्रसिध्द असून त्याचा एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या दरवर्षी भव्य स्वरुपात पुष्पोत्सव भरविण्यात येतो. प्रत्येक वृक्षप्रेमी नाशिककर मनपाच्या या पुष्पोत्सवाची आतुरतेने वाट पाहतो. यंदाही नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात अर्थात जानेवारीत मनपाच्या वतीने पुष्पोत्सव भरविण्यात येणार आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली असून अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद आहे.
यंदाही पुष्पोत्सव २०२५ चे आयोजन मनपा मुख्यालय राजीव गांधी भवनाच्या प्रांगणासह तीनही मजल्यांवर करण्यात येणार आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी २७ लाखांमध्ये पूर्ण पुष्पोत्सव झाले होते. यासाठी उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी विशेष परीश्रम घेतले होते. मात्र यंदा अधिक व्यापक स्वरुपात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याचा विचार मनपाकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण पुष्पोत्सवाच्या काळात दररोज मराठी सिनेमा व मालिकांचे कलाकारांना आमंत्रित करुन नाशिककरांना एक वेगळ्या स्वरुपाची मेजवानी देण्याचा प्रयत्न होत आहे. पुष्पप्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले राहील.
कार्यक्रमाच्या प्रांगणात संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तर पूष्पोत्सवात विविध प्रकारची गुलाब पुष्पे, हंगामी फुले, पुष्परचना, मिनीअर्चर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला आदींचे स्पर्धात्मक प्रदर्शन देखील ठेवण्यात येणार आहे. मागच्या वर्षी एकूण ५७ गट होते, मात्र यंदा त्यातदेखील वाढ होणार आहे. तर प्रत्येक गटासाठी बक्षिसे ठेवण्यात येणार आहे. देणाऱ्या येणाऱ्या बक्षिसे नामांकित कंपन्या, उद्योजक, सहकारी बँका, हॉटेल्स, व्यापारी समुह यांच्याकडून पुरस्कृत करुन घेण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना पुष्पप्रदर्शनामध्ये त्यांचेमार्फत तयार करण्यात आलेल्या विविध कलाकृती ठेवावयाच्या आहे, त्यांनी मनपाच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्टॉल्स मिळणार
पुष्पमहोत्सव २०२५ मध्ये मनपाच्या प्रांगणात नर्सरी चालक तसेच बाग-बगिचा साहित्याशी संबंधित व्यावसायिकांसाठी मनपा स्टॉल उपलब्ध करुन देणार आहे. स्टॉलचे बुकिंगसाठीही संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.
यंदा पुष्पोत्सव अधिक चांगल्या स्वरुपात करण्याचे नियोजन सुरू आहे. जानेवारी २०२५ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पुष्पोत्सवाचे नियोजन करुन विविध गटातील स्पर्धेत पुष्पप्रेमी नागरिकांनी, शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. तसेच या प्रदर्शनास अवश्य भेट देऊन कार्यक्रम यशस्वी करावे.
विवेक भदाणे, मनपा उद्यान अधीक्षक