Tuesday, March 25, 2025
Homeनगरगुलाब साईचरणी : फूल उत्पादक रोपवाटिकांना दिलासा

गुलाब साईचरणी : फूल उत्पादक रोपवाटिकांना दिलासा

राहाता | Rahata

साईबाबांच्या मंदिरातील फूलबंदी उठवली, यामुळे अस्तगाव भागातील फूल उत्पादक शेतकरी तसेच गुलाब रोपे तयार करणार्‍या रोपवाटिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. करोना काळापासून साईबाबा मंदिरात फूल वाहण्यास बंदी घातली होती. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. अनेकांनी त्या काळात फुले जनावरांना घातली. काहींनी बागा तोडून टाकल्या. अस्तगाव परिसरात 300 ते 400 एकर क्षेत्रावर गुलाब शेती उभी होती. ती फूल बंदीमुळे 100 एकरावर आली. शिर्डीला बाजारपेठ मिळत नव्हती. या 100 एकरातील गुलाबाची फूले मुंबई, सुरत, नांदेड, अमरावती, अकोला या भागात विकले जात होते. अस्तगाव भागातील शेतकर्‍यांचा फूल उत्पादन करण्याचा व्यवसाय प्रसिध्द आहे. या फूल शेतीमुळे अनेकांना रोजगार मिळतो. अनेक रोपवाटीका यामुळे उभ्या आहेत.

- Advertisement -

साई मंदिरातील फूले, हार नेण्यास बंदीमुळे फूल उत्पादक तसेच गुलाब रोपे तयार करणार्‍या रोपवाटिकांना याचा मोठा फटका बसला. गुलाबाला हक्काची बाजारपेठ नसल्याने गुलाबाची रोपे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या रोडावली. घराच्या परसबागेत लावण्यासाठीच गुलाब रोपे विकली जात. रोपवाटिकामध्ये गुलाबाची रोपे तयार करण्याचे कामही 10 ते 20 टक्क्यांवर आले होते. मध्यंतरी गुलाबाची रोपे मिळणे दुरापास्त झाले होते. ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून दाखल केलेल्या शेतकर्‍यांच्या खंडपिठातील याचिकेमुळे फूलांवरील बंदी उठविली. आता मंदिरात फुले सुरू झाल्याने शेतकरी व रोपवाटिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला. या निर्णयामुळे अस्तगाव तसेच शिर्डी परिसरातील बाजारपेठ फुलेल.

आता फुलांची मागणी वाढली, साहाजिकच रोपवाटिकांच्या दिशेने ग्राहकांची पावले वळू लागली आहेत. परंतु रोपवाटिकेत गुलाबाची रोपे मर्यादित आहेत. आता रोपवाटिकाधारक नविन गुलाबाची रोपे बनविण्याच्या प्रक्रियेत आहेत. 2005 साली एकरात 9 ते 10 हजार गुलाब निघत असे. आता एकरात अवघा 5 हजार निघतो. एकराला आता बदलत्या वातावरणामुळे एकरी 2 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे खर्च जास्त पण उत्पादन कमी ही स्थिती आहे. मात्र कधी-कधी दर बर्‍यापैकी मिळतात. गणपतीत दर चांगले मिळतात मात्र ते 10 दिवसांपुरतेच असते.

नागपूर, अमरावती, कारंजा परिसरात आता गुलाब वाढत आहे. त्यांनी अस्तगाव भागातूनच तंत्रज्ञान घेतले. या भागातील गुलाब तेथे जातो. सकाळी तोडलेला माल 11 वाजता व्यापार्‍यांकडे जातो. ते सायंकाळी रिपॅकिंग करतात व एखाद्या ट्रान्सपोर्ट मार्फत दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत नागपूर भागात पाठवितात. त्यामुळे तोडल्यापासून 24 तास होत असल्याने क्वालिटीवर परिणाम होतो. याउलट तेथे उत्पादित झालेले गुलाब फ्रेश असतात. त्यामुळे त्यांना दर मिळतात. आपल्या भागातील गुलाबाला दर चांगले मिळण्यासाठी शिर्डी मार्केट पुन्हा सुरू झाले ही चांगली गोष्ट आहे. असे गुलाब उत्पादक शेतकरी संजय चोळके यांनी सांगितले.

अस्तगाव परिसरातील गुलाबाला मागील काही वर्षापासून परराज्यातही मागणी आहे. या भागातून ट्रॅव्हल्स बसेसमधून अमरावती नागपूरसह मध्यप्रदेशातील इंदोर, जबलपूर, तसेच अहमदाबाद भागात गुलाब पाठविला जातो. शिर्डीत जे मार्केट फुलाला असेल त्यापेक्षा 10 रुपये कमी भाव शेतकर्‍यांना मिळतो. अस्तगाव येथे 10 ते 12 व्यापारी आहेत. 10 ते 15 टक्के गुलाब शिर्डीत विकला जातो. तर उर्वरित 80 टक्के गुलाब परराज्यात पाठविला जातो.
– हेमंत मुरादे, फूल व्यापारी, अस्तगाव

साई मंदिरातील फूल बंदी उठविल्याने आता अस्तगाव व शिर्डी परिसरात गुलाब शेती वाढणार आहे. रोपे जास्त बनवून शेतकर्‍यांना ती वाजवी दरात देवू.
सुनील त्रिभान, अक्षय नर्सरी, अस्तगाव

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...