Wednesday, June 26, 2024
Homeनगरसणांच्या तोंडावर फुलांचे भाव कोसळले

सणांच्या तोंडावर फुलांचे भाव कोसळले

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

- Advertisement -

पावसाने दडी मारल्याने एकापाठोपाठ एक पिके जळून शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. अशात पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी चार पैसे मिळण्याची आशा असलेल्या फुलांचे उत्पादन अतिशय कष्टाने मिळवले परंतु ऐन सणासुदीच्या तोंडावरच फुलांचे बाजार पडल्याने शेतकर्‍यांची चोहबाजुंनी कोंडी झाल्याचे चित्र आहे. अनेक शेतकर्‍यांना विक्रीसाठी नेलेली फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. तर पारनेर तालुक्यात अनेकांनी फुलांचे मळे आहे तसे सोडून दिले आहेत.

नुकतीच कृष्णजन्माष्टमी, गोपाळकाळा सण साजरा झाला. दहिहंडीच्या आयोजनाने सर्वत्र उत्साह भरला. यानंतर पंधरा दिवसांत लाडक्या गणराजाचे आगमन होणार आहे. यानंतर नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी असे लागोपाठ सण येत आहेत. परंतु या सणांच्या तोंडावर सर्वच प्रकारच्या फुलांचे दर खुपच घसरले आहेत. झेंडू, शेंवती या फुलांना पाच ते दहा रुपये किलोचा दर मिळणे अवघड झाले आहे. तिच अवस्था इतर फुलांचीही झाली आहे. भर उन्हाळ्यात केलेली मशागत, नर्सरीतून आणलेली रोपे, तीनशे ते चारशे रुपये लागवडीची मजुरी, उन्हाळाभर भरलेले थेंब थेंब पाणी, तीन महिन्यांत पोटच्या मुलांप्रमाणे जपत वेळोवेळी खते, औषेधे वापरून एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च शेतकर्‍यांचा झाला आहे. नेमके जेव्हा दोन पैसे मिळेल असे वाटत होते. तेव्हाच माशी शिंकली आणि फुलांचे बाजार मातीमोल झाले आहेत.

बाजारात आज रोजी उत्तम दर्जाची फुले विक्रीसाठी येत असली तरी त्यास ग्राहक खुपच कमी आहे. त्यामुळे जे काही ग्राहक आहेत ते मातीमोल दराने फुले मागत आहेत. फूल तोडणार्‍या महिलेला तीनशे ते चारशे रुपये मजुरी द्यावी लागते. वाहतूक, बाजारातील तोलाई, मापाई तसेच त्या शेतकर्‍यांचे कुटुंब राबते ते वेगळेच. हे सर्व करून माल बाजारात आल्यावर त्याची होणारी हेटाळणी पाहून शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.

याबाबत काही शेतकर्‍यांनी सांगितले की, बाजारात दुरदूरवरून फुले येतात. त्यांची स्थानीक मालाशी स्पर्धा होते. तसेच बाजारात सध्या प्लास्टिक व चायनीज फुलांची मोठी आवक आहे. ही प्लास्टिक चायनीज फुले खुपच आकर्षक असून ती कधीच सुकत नाहीत. ठराविक दिवसांनी धुतली की पुन्हा नवीन प्रमाणे दिसतात. एकदा घेतले की वर्षानुवर्षे चालतात. यामुळे ग्राहकांचा खोटी फुले घेण्याकडे कल आहे. परिणामी खर्‍या फुलांची मागणी घटत चालली आहे.

पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करत एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च करुन झेंडू पीक घेतले. परंतु आज रोजी झेंडूला पाच ते दहा रुपये किलोचा दर मिळत आहे. म्हणजे आज माल तोडणार्‍या महिलांचीही मजुरी मिळत नाही. म्हणून दोन अडीच एकर झेंडू सोडून दिला आहे.

– रामदास म्हस्के, झेंडू उत्पादक शेतकरी, पारनेर

- Advertisment -

ताज्या बातम्या