ओझे l विलास ढाकणे Oze
श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवाच्या काळात सप्तशृंगी गडावर येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, स्वच्छ व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागामार्फत गडावर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्रशासनाने धडक कारवाई करत विविध अन्न आस्थापनांची तपासणी केली. या कारवाईत एकूण 13 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली व 18 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले, तर जनआरोग्याच्या दृष्टीने अयोग्य असलेला आणि असुरक्षित वातावरणात वाहतूक करून व साठवून आणि कायद्यानुसार आवश्यक लेबल मजकूर नमूद न करता विक्री होत असलेला १,४०८.७ किलो पामतेलयुक्त मावासदृश्य मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त, परिमंडळ 4, संदीप देवरे यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या काळात गडावर येणाऱ्या भाविकांना गुणवत्तापूर्ण, सकस व सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, तसेच अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई घेणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
18 अन्न नमुने ; १,४०८.७ किलो पामतेलयुक्त मावासदृश्य मिठाईचा साठा नष्ट
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत सप्तशृंगी गडावर मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर गडावरील अन्न आस्थापना, मिठाई विक्रेते, पेढा प्रसाद विक्री केंद्रे आणि इतर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान एकूण 18 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तसेच सदरचे अन्न पदार्थ मिथ्या छाप व लेबल दोष, असुरक्षित व अस्वच्छ वातावरणात वाहतुक करून साठवून ठेवलेल्या अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जनआरोग्याच्या हितासाठी एकूण १,४०८.७ किलो पामतेलयुक्त मावासदृश्य मिठाई, किंमत रुपये 05 लाख,62हजार,नव्वद रुपये इतका नष्ट करण्यात आला.
अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक आणि हाताळणी या बाबींना विशेष महत्त्व देत प्रशासनाने ही कारवाई केली. उत्सवाच्या काळात भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी प्रशासनाने अन्नसुरक्षेच्या नियमांच्या अंमलबजावणीवर भर दिला.
पेढा विक्रेत्यांच्या शंकांचे निरसन; अन्नसुरक्षेच्या नियमांची माहिती
या मोहिमेदरम्यान सहायक आयुक्त संदिप देवरे यांनी पेढा विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व प्रश्नांचे शंका निरसन केले. अन्न व्यवसाय करताना आवश्यक असलेल्या अन्नसुरक्षेच्या नियमांची, स्वच्छतेची, अन्नपदार्थांच्या योग्य साठवणुकीची आणि सुरक्षित हाताळणीची माहिती विक्रेत्यांना समजावून सांगितली.
अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच त्याअंतर्गत लागू नियम व विनियमांचे पालन करावे, आवश्यक परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा आणि अन्नपदार्थांची गुणवत्ता व स्वच्छता याबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे आवाहन करण्यात आले.
प्रशासनाच्या या मार्गदर्शनामुळे अन्न व्यवसायिकांना नियमांची माहिती मिळण्यास मदत झाली. कारवाईसोबतच जनजागृती आणि मार्गदर्शनावर भर दिल्याने अन्नसुरक्षेच्या दृष्टीने या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग
ही विशेष तपासणी मोहीम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री. एस. जी. मंडलिक , श्री. एस. एस. तोरणे , चेतन परदेशी, प्रतीक भड, सोनल पाडळे, अक्षय गाडेकर आणि वैभव गर्दे, संकेत येलमामे यांनी सहभाग घेतला. तसेच नमुना सहाय्यक श्री. सचिन झुर्डे आणि श्री. विजय पगारे यांनीही मोहिमेदरम्यान कामकाज केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून गडावरील विविध अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली आणि अन्नसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात आली. सदर कारवाई यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, विश्वस्त संस्थान चे कर्मचारी, रोपवेचे कर्मचारी यांनीही सहभाग घेऊन कामकाज केले.
भाविक व ग्रामस्थांकडून कारवाईचे स्वागत
सप्तशृंगी गडावर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या या धडक कारवाईबाबत भाविक आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने तेथे विक्री होणारे अन्नपदार्थ स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार असणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या तपासणी मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे.
सप्तशृंगी गडावर राबविण्यात आलेल्या या प्रकारच्या तपासणी व कारवाईच्या मोहिमा इतर धार्मिक स्थळांवर आणि यात्रांच्या ठिकाणीही नियमितपणे राबविण्यात याव्यात, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे. अशा मोहिमांमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता वाढेल आणि भाविकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सुरक्षित अन्नपुरवठ्यासाठी प्रशासन कटिबद्ध
अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नपदार्थांची सुरक्षितता, स्वच्छता आणि गुणवत्ता याबाबत नियमित तपासणी केली जात आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. भाविकांना सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे आणि जनआरोग्याचे संरक्षण करणे याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेली ही विशेष मोहीम अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असून, अन्न व्यवसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.




