ओझे l विलास ढाकणे oze
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यभार स्वीकारल्यापासून दूध भेसळ रोखण्यासाठी कंबर कसली असून मागील तीन महिन्यात अचानकपणे राबविलेली ही तिसऱ्यांदा दूध तपासणी मोहीम आहे. मागील तीन महिन्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सुमारे सहा हजार नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत.
दि.०१ एप्रिल, २०२५ ते दि.०२ एप्रिल, २०२५ दरम्यान मुंबईतील दहिसर, ऐरोली व वाशी-मानखुर्द या ३ टोल नाक्यावर सदर मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ७९ वाहनातून १०८ दूध नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. एकूण दीड लाख लिटर दूधाची अचानकपणे तपासणी करण्यात आली.
दहिसर टोल नाक्यावर १० वाहनातून २० नमुने, ऐरोली नाक्यावर १८ वाहनातून ३३ नमुने, वाशी मानखुर्द नाक्यावर ५१ वाहनातून ५५ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. सदर दूध नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
चीज अनालॉग बाबत पनीर या अन्न पदार्थांचे नमुने घेण्याची विशेष मोहिम मार्चच्या अंतिम आठवडयात राबविण्यात आली असून पनीर चे एकूण २२८ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. दोन लाख रुपयांचा संशयित साठा जप्त करुन नष्ट केला आहे.
दूध भेसळ प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे नुकतीच बैठक पार पडली असून दूध भेसळखोरांवर मकोका/एमपीडीए कायदा आणता येतो का याबाबत विधी व न्याय विभागाला सुचना दिलेल्या आहेत. दूध भेसळप्रकरणी यापुढेही सदर मोहिम सुरु राहणार असून दूध भेसळखोरांवर कडक शासन करण्यात येईल, असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.