मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमार्फत ‘प्रोजेक्ट महादेव’ या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ आज (रविवार) करण्यात आला. जागतिक फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा उपक्रम मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे अधिकृतपणे लाँच झाला. यावेळी फुटबॉलपटू मेस्सीला बघण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
या कार्यक्रमास क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार राहुल भेके, अभिनेता टायगर श्रॉफ, अजय देवगण, कार्तिक आर्यन, दिनो मोरया यांच्यासह अनेक मान्यवर उपिस्थत होते.’प्रोजेक्ट महादेव’ या उपक्रमाचा मुख्य भाग म्हणून राज्यभरातून जिल्हास्तरीय निवड चाचण्यांमधून १३ वर्षांखालील ६० गुणवंत निवडले जाणार असून, ते फुटबॉलपटू लओनेल मेस्सीसोबत ४५ मिनिटांचे विशेष फुटबॉल प्रशिक्षण शिबीर आणि मार्गदर्शन सत्रात सहभागी होणार आहेत.
दरम्यान, ‘प्रोजेक्ट महादेव’ हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात येत आहे. या विविध संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धोरणात्मक दिशा, तळागाळातील सहभाग, व्यावसायिक फुटबॉल कौशल्य, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय पाठबळ मिळून राज्यात एक सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार आहे.
‘प्रोजेक्ट महादेव’चा उद्देश काय?
मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळविणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी पात्र ठरणे व विजेतेपदाचे लक्ष्य ठेवून ‘प्रोजेक्ट महादेव’ राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत १३ ते १८ वयोगटातील खेळाडूंना शिस्तबद्ध प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून निवड झालेल्या खेळाडूंमुळे हा उपक्रम सर्वसमावेशक आणि राज्यव्यापी स्वरूपाचा आहे.




