श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
स्वतःच्या पत्नीलाच गोळ्या खाऊ घालून पर पुरूषाबरोबर शरीरसंबंध ठेवायला लावण्याचा प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे लग्न दि. 15 डिसेंबर 2014 रोजी झाले. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने माझे पती माझ्याशी चांगले वागले. मात्र, त्यानंतर त्यांनी मला दररोज शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. माझ्या सासू-सासर्यांनीही मला मानसिक त्रास दिला. सुमारे दीड वर्षांपूर्वी माझ्या पतीने मला लोणी येथील एका अनोळखी व्यक्तीच्या घरी नेले. त्या व्यक्तीला मी ओळखत नव्हते, तरीही माझ्या इच्छेविरुद्ध त्याने माझ्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.
तसेच जर मी कोणाला काही सांगितले तर माझे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर सुमारे 11-12 महिन्यांपूर्वी माझ्या पतीने एका अनोळखी व्यक्तीशी सोशल मीडियावर ओळख करून त्याला भेटायला बोलावले. त्यांनी मला शहरातीलच एका लॉजवर नेवून त्या व्यक्तीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्या ठिकाणी आणखी एक अनोळखी पुरुष आणि महिला उपस्थित होते. माझ्या नकळत माझ्या चहात काहीतरी मिसळले गेले व मला भुरळ पडली. त्यामुळे मी अनोळखी व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यास भाग पडले. त्याचवेळी माझ्या पतीनेही त्या अनोळखी महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. याशिवाय, काही महिन्यांपूर्वी परीक्षा देऊन घरी परतत असताना माझ्या पतीने मला जबरदस्तीने गंगापूर येथे नेले.
तिथे त्याने मला एका अनोळखी पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. स्वतः त्या व्यक्तीच्या पत्नीसोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मी नकार दिल्याने त्या व्यक्तीने संबंध ठेवले नाहीत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये सदर महिलेच्या फिर्यादीवरुन तिच्या पतीविरोधात कलम 376, 323, 504, 506, 498 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.