अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कोतवाली पोलीस ठाण्याच्या कार्यकुशल तपासामुळे अवघ्या दोन महिन्यांत जबरी चोरी प्रकरणात आरोपीस शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या कारवाईचे विशेष म्हणजे नवीन कायद्यानुसार पंचनामे व इतर कामकाज पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले व जलदगतीने खटल्याचा निकाल लागला. कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 309 (6), 3 (5) प्रमाणे दाखल गुन्हा नोंदविण्यात आला होता. यामध्ये रवींद्र काशिनाथ लांडगे (वय 32 रा. पिंपळगाव लांडगा, ता. अहिल्यानगर) यांना मारहाण करून त्यांच्याकडील रिक्षा बळजबरीने चोरून नेली होती.
सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख व गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास सुरू करून अवघ्या सहा तासांत पहिला आरोपी रूपेश विठ्ठल रूपनर (रा. माका, ता. नेवासा) याला अटक केली. त्याच्याकडून जबरी चोरीस गेलेली 80 हजार रूपये किमतीची ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली. यानंतर फक्त 24 तासांत दुसरा आरोपी विजय दिलीप झेंडे (रा. कोठी, अहिल्यानगर) यासही अटक करण्यात आली. झेंडे हा अटक झाल्यापासून न्यायालयीन कोठडीत राहिला, तर रूपनर हा जामीन झाल्यानंतर पसार झाला होता व न्यायालयात हजर राहत नव्हता.
दरम्यान, सदर प्रकरणाचा तपास अवघ्या 15 दिवसांत 2 जुलै 2025 रोजी पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. तपासामध्ये पंचनामे व पुरावे संकलित करण्यासह सर्व प्रक्रिया नव्या कायद्यानुसार करण्यात आली. सदर खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सरकारी अधिवक्ता म्हणून भाग्यश्री कुंजर यांनी काम पाहिले. न्यायालयाने दोघा आरोपीस 5 वर्षांची सक्तमजुरी व 5 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
कोतवाली पोलिसांचा दक्ष तपास
या संपूर्ण तपासामध्ये निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक देशमुख, पोलीस अंमलदार लक्ष्मण बोडखे, विशाल दळवी, सोमनाथ केकाण, सत्यम शिंदे, प्रतिभा नागरे यांच्यासह कोर्ट पैरवी म्हणून अंमलदार राजेंद्र माळी, सचिन डमाळे, सविता शेंडगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणामुळे पोलिसांच्या दक्ष तपासकौशल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पार पडून समाजात कायद्याविषयी विश्वास दृढ झाल्याचे समाधान नागरिकांमध्ये व्यक्त केले जात आहे.





