बीड | Beed
भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA) यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला आणखी एक दणका बसला आहे. गरीबाला अमानुष मारहाण करत दहशत माजवणारा गुंड खोक्या भाईच्या घरावर वनविभागाने (Forest Department) थेट बुलडोझर चालवला आहे.
सतीश भोसलेने वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण (Encroachment) करून घर (House) बांधल्याचा दावा वनविभागाने केला आहे. त्यामुळे वन विभागाने ही कारवाई केली आहे. कारवाई करण्यापूर्वी वन विभागाने खोक्याला नोटीस पाठवली होती. मात्र, ४८ तासांमध्ये उत्तर न आल्यामुळे त्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.
तसेच दोन दिवसांपूर्वी वन विभागाने त्याच्या अनधिकृत घरावर धाड टाकली असता खोक्याच्या घरात धारदार शस्त्र, जाळी, प्राण्यांचे मांस अशा अनेक गोष्टी आढळून आल्या होत्या. त्याने आतापर्यंत अनेक जनावरांची शिकार केली असल्याचे वनविभागाच्या निदर्शना आले होते. त्यानंतर खोक्याचे अनधिकृत घर देखील वनविभागाच्या जागेवर असल्याचे समोर आल्याने वनविभागाने कारवाई करत खोक्याचे घर जमीनदोस्त केले आहे.
दरम्यान, खोक्या उर्फ सतीश भोसले फरार झाला होता. यानंतर त्याला शोधण्यासाठी पोलिसांकडून (Police) जोरदार प्रयत्न केले जात होते.अखेर प्रयागराजमध्ये खोक्या लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) संयुक्त कारवाई करत त्याला अटक (Arrested) केली.
२० दिवसांत तीन गुन्हे दाखल
एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाच सतीश भोसलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याने ढाकणे पिता-पुत्रालाही बेदम मारहाण केली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर सतीश भोसले फरार झाला होता. त्याच्यावर गेल्या २० दिवसात वेगवेगळ्या प्रकरणात ३ गुन्हे (Case) दाखल झाले आहेत.