Friday, June 14, 2024
Homeनगरवन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा; शेतकर्‍यांची मागणी

वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा; शेतकर्‍यांची मागणी

राहाता |वार्ताहर| Rahata

- Advertisement -

येथील 15 चारी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रब्बी पिकांना रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी बिबट्याच्या दहशतीमुळे शेतमजूर मिळत नसल्याने वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी 15 चारी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

राहाता येथील 15 चारी परिसरातील सोनवणे फार्म, मुरादे, बोठे, सदाफळ, गिरमे, मुथा वस्तीवर बिबट्याचा वावर वाढला असल्याने सध्या रब्बी पिकांना रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस व फळबागा असल्याने बिबट्या दिवसा या ठिकाणी आसरा घेतो व रात्रीच्या वेळी सायंकाळी 7 नंतर अनेकांना दर्शन देतो.

15 चारी येथील प्रवीण मुरादे यांच्या गोठ्या समोर बांधलेल्या कुत्र्याला बिबट्याने शिकार बनवली तर सोनवणे फार्म येथील संकेत शेळके व लांडगे वस्ती येथील कार्तिक लांडगे हे पहाटे 5 वाजे दरम्यान गुलाबाचे फुले तोडण्यासाठी दुचाकीवरून बागेत जात असताना बाळासाहेब सोनवणे यांच्या पेरूच्या बागेत लपून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्तिक लांडगे या तरुणाने प्रसंगावधन राखून दुचाकीचा वेग वाढल्यामुळे ते बिबट्याच्या हल्ल्याततून बालबाल बचावले.

सध्या गहू, हरभरा, ऊस ,फळबाग या पिकांना पाण्याची गरज असल्याने त्यांना पाणी देण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत घेत आहे. कृषी पंपाची वीज शेतकर्‍यांना 8 तास सुरळीतपणे मिळत नसल्याने शेतकर्‍यांना पिके वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. परंतु 15 चारी परिसरात बिबट्याने गेल्या 8 दिवसांपासून धुमाकूळ घातल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यासाठी मजुर मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

मागील आठवड्यात आमच्या गायीच्या गोठ्यासमोर बांधलेल्या कुत्र्याला बिबट्याने रात्रीच्या वेळी साखळी तोडून शिकार बनवले. सध्या कृषी पंपाची वीज सुरळीत नसल्यामुळे पिके पाण्यावर आली आहे, परंतु बिबट्याच्या भीतीने रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जाता येत नाही व शेतमजूर मिळत नाही. वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.

– प्रवीण मुरादे, शेतकरी

गेल्या आठवड्यापासून बिबट्याने या परिसरात धुमाकूळ घातला असून या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस व फळबागा असल्याने शेतात काम करण्यासाठी जाण्याची भीती वाटते.

– संजय शेळके, शेतमजूर

- Advertisment -

ताज्या बातम्या