Tuesday, June 25, 2024
Homeनगरवनपर्यटनाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - ना. विखे

वनपर्यटनाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – ना. विखे

आश्वी |वार्ताहर| Ashwi

- Advertisement -

जिल्ह्यात निसर्ग व वनसंपदा भरपूर असल्याने वन पर्यटन स्थळे विकसित करण्याची संधी आहे. वन पर्यटनात जिल्हा अग्रभागी राहिला पाहिजे यासाठी निधी कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिली.

संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निझर्णेश्वर देवस्थान येथे शासनाच्या वन विभागाच्या वतीने मानव बिबट सहजीवन जागृती केंद्र साकारण्यात आले आहे्. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून हे केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन ना. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अहमदनगर वन विभाग उपवनसंरक्षक सुवर्णा माने, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे पाटील, माजी आमदार राजाभाऊ वाजे, संगमनेर भागाचे वनपरिक्षक सागर केदार, सहाय्यक वनसंरक्षक संदिप पाटील तसेच नितीन दिनकर, नितीन कापसे, मच्छिंद्र थेट, दिलीप शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी अगदी सुरूवातीला या परिसरात वनराई विकसित करण्यास प्राधान्य दिले. सर्वांचे श्रध्दास्थान असलेले हे ठिकाण निसर्गछायेत आहे. त्यामुळे या भागात असलेल्या वनराईचा उपयोग करून तयार केलेले पर्यटन केंद्र हा एक प्रयोग आता वनराई उपलब्ध असलेल्या अन्य तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी करता येईल का याचा विचार वन विभागाने करावा.

मानव बिबट सहजीवन केंद्रामुळे देवस्थान परिसर फुलून गेला आहे. वन्यप्राण्यांचा या क्षेत्रात वावर आहे. यामुळे या तिर्थक्षेत्राला आगळ-वेगळ स्वरूप येणार आहे. परंतू याला आता नियमावली करावी, कारण पर्यटनाचा आनंद घेताना या तिर्थस्थानाचे पावित्र्यही राखले गेले पाहीजे याची काळजी आणि जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

मानव बिबट सहजीवन केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर महसूलमंत्र्यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी त्यांना सहजीवन केंद्रांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनरक्षक संतोष पारधी व आभार सागर केदार यांनी केले.

मानव बिबट सहजीवन केंद्र

मानव बिबट सहजीवन जागृती केंद्राच्या माध्यमातून वन्यप्राणी, पशु पक्षी, कीटक व वृक्षांचे मानवी सहजीवनातील महत्त्वाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. या केंद्रात फुलपाखरू उद्यान, मधमाशी उद्यान, रॉक उद्यान, निवडुंग उद्यान, झुलता पूल, आरोग्य वन, ऑक्सिजन वन, सेल्फी पाईट, ओपन जिम, मियावाकी गार्डन, सोलर स्ट्रीट लाईट, सोलर वॉटर पंप, बाल उद्यान साकारण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या