मुंबई | Mumbai
ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि लोकप्रिय समालोचक डीन जोन्स(Dean Jones) यांचे मुंबईत ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. IPL2020 चे प्रक्षेपण करणाऱ्या Star Sports कंपनीसाठी समालोचन करण्यासाठी मुंबईत आले होते. मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ते वास्तव्याला होते.
डीन जोन्स यांची कारकीर्द
डीन जोन्स यांनी 1984 ते 1992 या दरम्यान कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले. 8 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 52 कसोटी सामने खेळले. जोन्स यांनी 46.55 च्या सरासरीने 3631 धावा केल्या. कसोटी सामन्यात 11 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली. 216 ही जोन्स यांची कसोटीमधील सर्वाधिक धावसंख्या होती. एकदिवसीय सामन्यात डीन जोन्स यांनी 164 सामन्यांमध्ये 44.61 च्या सरासरीने 6068 धावा केल्या. यामध्ये 7 शतके आणि 46 अर्धशतकांचा समावशे होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून क्रिकेट खेळल्यानंतर जोन्स यांनी प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून काम केले होते.