पुणे | Pune
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे काँग्रेस (Congress) सोडणार असल्याची चर्चा चालू होती. अखेर ही चर्चा खरी ठरली असून धंगेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम केला आहे. त्यानंतर रवींद्र धंगेकर आज सायंकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काँग्रेस सोडताना दु:ख व्यक्त होत असल्याची भावना यावेळी रवींद्र धंगेकर यांनी व्यक्ती केली.
यावेळी बोलतांना धंगेकर म्हणाले की, “मी गेल्या १०-१२ वर्षांपासून या पक्षाबरोबर काम करत आहे. पक्षाबरोबर एक कौटुंबिक नातं तयार झालं आहे. पक्षातील सहकारी हे कुटुंबातील सदस्य बनले आहेत. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. मी गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली, विधानसभा निवडणूक लढवली, या काळात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी माझ्यामागे मोठी ताकद उभी केली. त्यांच्या जोरावरच मी त्या निवडणुका लढवू शकलो. मी निवडणुकीत पराभूत झालो ती वेगळी गोष्ट आहे. मात्र पक्षातील लोकांनी माझ्यासाठी कष्ट केले. सर्वांनी माझ्याबरोबर ताकद उभी केली होती. त्यामुळेच आता पक्ष सोडताना मला खुप दुःख होत आहे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,”आपण सगळी माणसं आहोत. अशा प्रसंगी आपल्याला दुःख होतंच. मात्र, कार्यकर्ते (Worker) गेल्या काही दिवसांपासून सांगत होते, चर्चा करत होते. माझी मतदारांशी चर्चा झाली. त्या सर्वांचं म्हणणं आहे की आमची कामं कोण करणार? लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांची कामं करू शकत नाही. अशा वेळी माझी दोन-तीन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली. मी त्यांच्याशी चर्चा केली. मंत्री उदय सामंत हे देखील माझे मित्र आहेत. माझी त्यांच्याशी देखील चर्चा झाली. त्यांनी वारंवार सांगितलं की एकदा आच्याबरोबर काम करा,” असेही रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.