काँग्रेसचे उद्या दिल्लीत आंदोलन
नवी दिल्ली – ढासळती अर्थव्यवस्था, एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर बोलताना ते ट्विट करत म्हणाले, ‘मोदी आणि शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. अर्थव्यवस्थेला पोहोचवलेली हानी आणि घटलेल्या रोजगारामुळे मोदी सरकार तरुणांच्या रागाला सामोरं जाऊ शकत नाही. त्यामुळे ते आपल्या प्रिय असलेल्या भारतामध्ये फूट पाडून द्वेष लपवत आहेत. मोदी आणि अमित शहा देशाचं विभाजन करत आहेत आपण प्रत्येक भारतीयाविषयी प्रेम व्यक्त करून त्यांचा पराभव करू शकतो.’ काँग्रेसच्या महासचिव आणि राहुल यांची बहीण प्रियांका यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर दुसर्याच दिवशी राहुल यांनी हे ट्विट केले आहे.
दरम्यान सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात सध्या राजधानी दिल्लीसह देशभरात विविध प्रमुख शहरांमध्ये तीव्र निदर्शने सुरू आहेत. अनेक ठिकाणच्या आंदोलनास हिंसक वळण लागून जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस उद्या राजघाट येथे आंदोलन करणार आहे. रविवारीच आंदोलन होणार होते, पण पंतप्रधानांच्या मेळाव्यामुळे काँग्रेसला परवानगी मिळू शकली नाही. या बैठकीला पक्षाचे प्रमुख नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्याआंदोलनाला पाठिंबा आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात हे धरणे आंदोलन करण्यात येईल, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा आणि काँग्रेसचे इतर अनेक वरिष्ठ नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.