शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून ज़्यादा पैसे घेऊन एका नगरसेवकानेच ब्लॅकने पास विकला. तसेच डोनेशन काउंटरवर भाविकांची होत असलेल्या फसवणुकीबाबत साई संस्थान प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांच्याकडे केली आहे.
शिर्डीतील एका प्रतिष्ठित नागरिकाने भाविकाकडून जादा पैसे घेऊन दर्शन पास विकल्याची चर्चा शिर्डीत सुरू असल्याच्या पार्श्वभुमीवर शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, शिवाजी गोंदकर, अभय शेळके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, सुजीत गोंदकर, कृषी उत्पन्न बाज़ार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, सुनील गोंदकर, नगरसेवक रवींद्र गोंदकर, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, नितिन कोते, विजय जगताप, रमेश गोंदकर, सुनील गोंदकर यांच्यासह शिर्डीतील नागरिकांनी साईबाबा संस्थानचे सीईओ पी. शिवा शंकर यांची भेट घेऊन चर्चा केली.
ग्रामस्थांनी भाविकांना झटपट दर्शनाच्या नावाखाली लूट करणार्या तथाकथित लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच संस्थानच्या देणगी काउंटरवर भाविकांची होत असलेल्या फसवणुकीबाबत संबंधित कर्मचार्यांवर कारवाई करण्यास संस्थानकडून दिरंगाई होता कामा नये. गुरूवारच्या साईंच्या पालखीबाबत नियमावली तयार करून मानकर्यांच्या घरातील फक्त एकालाच पालखीला परवानगी असावी. याबाबत सीईओ यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली. महाराष्ट्र पोलीस दलाच्या कर्मचार्यांना मंदीर परिसरात नको तर मंदीर परिसराच्या बाहेर भाविकांची लूट व फसवणूक होऊ नये या बंदोबस्तासाठी तैनात करावे ,अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
साईबाबा संस्थानच्या पीआरओ विभागातून ऑफ लाईन पास देण्यासाठी शिफारस करणार्या व्यक्तिला त्याबाबत पास वितरीत करताना ओटीपी नंबर अथवा एसएमएस आला तर बोगस पास वितरणावर नियंत्रण मिळवता येईल. दररोज कोणी किती लोकांच्या दर्शनासाठी शिफारस केली याची यादी जाहीर करण्यात यावी. याबाबतही शिर्डी ग्रामस्थांनी आग्रह धरल्यावर सीईओ शिवशंकर यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
गुरूवारच्या पालखीसाठी नियमावली तयार करावी. मानकर्यांच्या व्यतिरीक्त लोकांना पालखीच्या आसपास मुक्तसंचार नको. भाविकांकडून जादा पैसे घेवून पास विकणार्यांना संस्थानकडून यापुढे पास देण्यात येवू नये.
– कैलास कोते, माजी नगराध्यक्ष, शिर्डी
शिर्डीतील एका माजी नगरसेवकाने दर्शन पास विकल्याची तक्रार आली आहे. ऑफ़लाईन पास देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. ऑनलाईन दर्शन पास सर्वांना उपलब्ध आहे. ऑफ़लाईन पासेस देताना भाविकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल. डोनेशन काउंटर बनावट पावतीबाबत निनावी अर्ज़ संस्थानला प्राप्त झाला असून त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल.
– पी. शिवा शंकर, सीईओ साईसंस्थान
शिर्डीत आलेल्या भाविकांची फसवणूक होणार नाही याकडे साईसंस्थानने लक्ष द्यावे. चुकीचे काम करणार्यांना कायदेशीर चाप लावावा. पास विक्री करणार्यासह डोनेशनमध्ये अफरातफर करणार्यांवर तातडीने कारवाई करावी.
– कमलाकर कोते, जिल्हाप्रमुख शिवसेना