Tuesday, May 21, 2024
Homeधुळेकाँग्रेसला मोठा धक्का! माजी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळेंचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का! माजी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळेंचा भाजपमध्ये प्रवेश

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि ग्रामीण कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Dr.Tushar Shewale) यांनी आपल्या समर्थकांसह आज धुळे (Dhule) येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP)प्रवेश केला. यावेळी मालेगाव कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. शेवाळे यांच्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला (Congress) मोठा हादरा बसला असून हा पक्षप्रवेश कॉंग्रेसच्या धुळे लोकसभेच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या अडचणीत अधिक वाढ करणारा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढविण्यासाठी डॉ. तुषार शेवाळे हे गत पंधरा वर्षापासून इच्छुक होते. मात्र, वेगवेगळी कारणे सांगून त्यांना थांबविण्यात आले होते. पक्ष नेतृत्वातर्फे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याने गत चार वर्षापासून ते धुळे व नाशिक जिल्ह्यात सक्रिय झाले होते. जलशिवार अभियानाद्वारे त्यांनी मालेगाव व बागलाण तालुका व धुळे तालुक्यात सिंचनाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम देखील केले होते. काँग्रेसतर्फे यंदा धुळे लोकसभेसाठी डॉ. शेवाळे व धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर हे प्रबळ दावेदार असतानाही त्यांना डावलून पक्ष नेतृत्वाने नाशिकच्या माजी महापौर डॉ. शोभा बच्छाव (Dr.Shobha Bachhav) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शेवाळे नाराज असल्याचे बोलले जात होते.

बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्ष नेतृत्वावर संताप व्यक्त करत डॉ. शेवाळे व शाम सनेर यांनी आयात उमेदवार चालणार नाही अशी ठाम भूमिका घेत जिल्हाध्यक्षपदांचे राजीनामे दिले होते. तर उमेदवारी मिळाल्यानंतर मालेगाव तालुका (Malegao Taluka) काँग्रेस कमिटीत डॉ. शेवाळे व पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शोभा बच्छाव यांना संतप्त पदाधिकाऱ्यांनी चले जाव सांगत तीव्र विरोध केला होता. तसेच ‘आम्ही तुमचे काम करणार नाही’ असेही यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे डॉ. बच्छाव यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे डॉ. बच्छाव यांना कार्यालयातून बाहेर पडण्याची वेळ आली होती.

तसेच उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांची नाराजी दूर करण्यास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना यश आले होते. तर डॉक्टर शेवाळे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी वर्णी लावण्यात आली होती. मात्र, या नियुक्तीवर डॉ. शेवाळे यांनी कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते अस्वस्थ होते. पक्षासाठी निष्ठेने काम करून देखील न्याय न देता पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध असताना देखील बाहेरून उमेदवार आणून मतदारसंघात लादण्यात आल्याने संतप्त असलेल्या डॉ. शेवाळे यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, त्यानंतर आज धुळे येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बावनकुळे यांनी डॉ. शेवाळे व तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करत सत्कार केला. यावेळी मंत्री जयकुमार रावल, धुळे लोकसभेचे उमदेवार डॉ. सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष निलेश कचवे ज्येष्ठ नेते सुनील गायकवाड, शहराध्यक्ष देवा पाटील, व्यापारी आघाडीचे प्रमुख नितीन पोफळे,घनश्याम वर्मा, मदन बापू गायकवाड, अभिषेक भावसार, दीपक शिंदे, राजेंद्र शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या