Saturday, November 14, 2026
Homeदेश विदेशगोध्रा रेल्वे अग्निकांड पुन्हा चर्चेत! सोनिया गांधींच्या पुस्तकातील उल्लेखावर राकेश अस्थानांचा आक्षेप;...

गोध्रा रेल्वे अग्निकांड पुन्हा चर्चेत! सोनिया गांधींच्या पुस्तकातील उल्लेखावर राकेश अस्थानांचा आक्षेप; म्हणाले, जर कुणाला…

नवी दिल्ली | New Delhi
गुजरातमधील २००२ च्या गोध्रा रेल्वे अग्निकांडाला २४ वर्षांहून अधिक काळ लोटला असला, तरी या घटनेवरील वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकात साबरमती एक्स्प्रेसला लागलेल्या आगीचे कारण अद्याप विवादित असल्याचा उल्लेख केला आहे. या वादावर आता प्रकरणाची चौकशी करणारे सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रात ट्रेनला आग लागण्याच्या कारणासंदर्भात संशय व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात, अस्थाना यांनी आक्रमक भूमिका घेत, हा तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि न्यायालयातही सिद्ध झाल्याचे म्हटले आहे.

सोनिया गांधी यांनी काय दावा केला?
सोनिया गांधी यांनी आपल्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात म्हटले आहे, “साबरमती एक्सप्रेसच्या चार डब्यांना आग लागली होती. ज्यात ५९ यात्रेकरू ठार झाले. यानंतर, दंगली उसळल्या. ही ट्रेन अयोध्येहून राज्याची राजधानी अहमदाबादकडे परत जात होती. त्यात हिंदू कारसेवक उपस्थित होते. मात्र, आगीचे कारण आजही वादग्रस्त आहे. मात्र, यानंतर, झालेला राडा राज्याच्या अनेक भागांत पसरला. संबंधित साबरमती एक्सप्रेसच्या चार बोग्यांना आग लागण्याची घटना २७ फेब्रुवारी २००२ रोजी घडली होती.

- Advertisement -

सोनिया गांधींवरील पोस्ट कंगनाला भोवली! खासदार कंगना रणौतविरोधात गुन्हा दाखल

राकेश अस्थानांनी काय सांगितले?
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अस्थाना यांनी सोनिया गांधी यांच्या विधानाचे खंडन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला आग अपघाताने लागलेली नव्हती, तर ज्वलनशील पदार्थाचा वापर करून ती जाणीवपूर्वक लावण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास फॉरेन्सिक पुरावे, स्वतंत्र साक्षीदारांचे जबाब आणि जळालेल्या डब्याच्या वैज्ञानिक तपासणीच्या आधारे करण्यात आला. तपासातील निष्कर्षांना न्यायालयीन प्रक्रियेतही महत्त्व मिळाले, असे अस्थाना यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात केवळ आरोपींच्या कबुलीजबाबांवर अवलंबून न राहता स्वतंत्र पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे तपास पुढे नेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जर कुणाला अजूनही शंका असेल, तर त्यामागे राजकीय कारणे आहेत. दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही.” हे राजकीय कारण कोणत्या विशिष्ट व्होट बँकेशी जोडलेले आहे का, असे विचारले असता, अस्थाना म्हणाले, “गोध्रामध्ये मारले गेलेले सर्व हिंदू होते. आणि कुणाचाही मृत्यू झाला असला तरी, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा शीख, मृत्यू हा मृत्यूच असतो आणि खून हा खूनच असतो. यामुळे, आम्ही याचा तपास एक गुन्हेगारी घटना म्हणून केला. मात्र, दुर्दैवाने, जणू काही हा तपास मोदींना फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने केला गेला होता, अशा पद्धतीने हे प्रकरण प्रस्तुत करण्यात आले.

चेन पुलिंग अन् S-6 डब्यात 140 लिटर पेट्रोल
राकेश अस्थाना यांनी 2002 मधील त्या काळ्या दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम सांगताना धक्कादायक माहिती दिली. सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी ट्रेन प्लॅटफॉर्मवरून पुढे सरकताच 3 ते 4 डब्यांतून एकाच वेळी चेन पुलिंग करण्यात आली. ट्रेन पुन्हा सुरू झाल्यावर अर्धा किलोमीटर अंतरावर व्हॅक्यूम की फिरवून 4 डब्यांची चेन पुलिंग करून ट्रेन ‘सिग्नल फलिया’ परिसरात थांबवण्यात आली. ट्रेन जिथे थांबली तिथे आधीच 150 ते 200 लोकांचा जमाव उभा होता आणि त्यातील 20 ते 25 तरुणांनी पेट्रोल जमा करून ठेवले होते.

हल्लेखोरांनी S-6 आणि S-7 डब्यांमधील कॅनव्हासचे वेस्टिब्यूल कापले. प्रवाशांनी दगडफेकीमुळे दरवाजा आतून बंद केला होता, मात्र काहींनी दरवाजा ढकलून आत प्रवेश केला आणि तब्बल 140 लिटर पेट्रोल डब्यात ओतून बाहेर उडी मारली.

बाहेर उभ्या असलेल्या जमावाने दगडफेकीत फुटलेल्या खिडक्यांमधून आत पेटत्या मशाली फेकल्या. अवघ्या 5 मिनिटांत संपूर्ण S-6 डबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या भीषण घटनेत 27 महिला, 10 मुले आणि 22 पुरुष अशा एकूण 59 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पत्नी असतानाही अल्पवयीन मुलीला पळवून नेले! तिरुपती-अक्कलकोटसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik ​विवाहित असूनही १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या मुंबईतील (Mumbai) ३४ वर्षीय तरुणाला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या (अंबड...