अहिल्यानगर (प्रतिनिधी)
नोकरीच्या आमिषाने दोन महिलांवर अत्याचार करून गुन्हा दाखल होताच पसार झालेला माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकर (रा. भुतकरवाडी चौक, सावेडी) यास न्यायालयात हजर राहण्याबाबत जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. कळमकर सुमारे दोन महिन्यांपासून पसार असून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने न्यायालयाने ही कारवाई केली आहे.
अभिषेक कळमकर याने पुणे जिल्ह्यातील एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरूध्द वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच महिला व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. यावरून पीडितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दरम्यान, सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून अभिषेक पसार झाला आहे. त्याच दरम्यान आणखी एका तरूणीने अभिषेकवर गंभीर आरोप करत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर देखील अत्याचार करण्यात आला असल्याचा पीडितेचा आरोप आहे. त्यानुसार अभिषेक विरोधात अत्याचाराचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, अभिषेक याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पथके पाठवूनही तो मिळून आला नाही. यामुळे त्याच्याविरूध्द स्टँडिंग वॉरंट काढण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही तो हाती न लागल्याने पोलिसांनी न्यायालयाकडे पुढील कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला. यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी संशयित आरोपीस तात्काळ न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देत सार्वजनिक ठिकाणी जाहिरनामा प्रसिध्द करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस प्रशासनाने संबंधित संशयित आरोपीस तातडीने न्यायालयात हजर राहण्याचे आवाहन केले असून, नागरिकांनीही या प्रकरणाबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
…तर मालमत्तेवर जप्ती
सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील अभिषेक कळमकर पोलिसांना सापडत नसल्याने न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, संशयित आरोपी अभिषेक कळमकर हा न्यायालयासमोर हजर न राहिल्यास त्यास फरार आरोपी घोषित करण्यात येईल. तसेच पुढील टप्प्यात त्याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.





