श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
मंत्री श्री. विखे व माजी मंत्री आ.थोरात यांची छुपी युती असून ते मिलीभगत करुन सत्ता मिळवतात, आणि इतरांवर अन्याय करतात. ज्या थोरातांनी मंत्री असतांना सन 2005 मध्ये समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याचे विधेयक विधानपरिषदेत मांडले तेच आता दिशाभूल करीत आहेत. भंडारदर्याची पाणी आपल्या भागाला मिळण्यासाठी वेळप्रसंगी लढा व आंदोलने करावी लागतील. त्यासाठी सर्वांनी एकजूट दाखविली पाहिजे. भंडारदर्याचे पाणी आधी निळवंडेत येते. त्यामुळे या पाण्याचा अकोले व संगमनेर भागात गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वांना जागरूक राहावे लागेल. गणेश कारखान्याप्रमाणेच प्रवरा व संगमनेर कारखान्याने अशोकच्या कार्यक्षेत्रातून ऊस नेवू नये, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
अशोक कारखान्याची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर होऊन पार पडली. त्यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानावरुन श्री.मुरकुटे बोलत होते. याप्रसंगी संचालक रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, सौ.इंदूताई डावखर, ज्ञानदेव साळुंके, सौ.मंजुश्री मुरकुटे, सौ.सुनिता गायकवाड, सौ.शालिनी कोलते, हनुमंतराव वाकचौरे, हिम्मतराव धुमाळ, सचिन गुजर, अॅड.सुभाष चौधरी, सुधीर नवले, बापुराव त्रिभुवन, काशिनाथ गोराणे, बाबासाहेब ढोकचौळे, भाऊसाहेब उंडे, दत्तात्रय नाईक, रामदास पटारे, भाऊसाहेब हाळनोर, सखाराम कांगुणे आदी उपस्थित होते.
श्री.मुरकुटे पुढे म्हणाले की, निळवंडेच्या पाण्याचा अकोले, संगमनेर, राहाता व कोपरगाव तालुक्यातील काही गावांना फायदा होईल. श्रीरामपूर व नेवासा तालुक्याला आणि उर्वरित राहुरी तालुक्याला काहीच लाभ व फायदा नाही. पुढच्या पिढ्यांच्या हितरक्षणासाठी पाटपाण्याबाबत दक्ष राहावे लागेल. सभासदांचा आपल्यावर विश्वास असल्याने 35 वर्षे आमच्याकडे कारखान्याची सुत्रे दिलेली आहे. आम्हीही 100 कोटींचा इथेनॉल प्रकल्प, 100 कोटींचा डिस्टीलरी प्रकल्प, वीज निर्मिती प्रकल्प यासह पॉलिटेक्निक, डी. फार्मसी व महाविद्यालय, आय.टी.आय. व दोन स्कुल असे शिक्षण संकुल उभे केले. त्याबद्दल आरोप करणारे शब्दभरही बोलत नाहीत. जेवढे उत्पन्न सर्व मार्गाने मिळते त्यातून खर्च वजा जाता सभासदांना भावाच्या दराचे वाटप केले जाते.
जिल्ह्यातील काही कारखान्यांकडे उपपदार्थ, वीजनिर्मिती प्रकल्प असताना कमी भाव देतात. त्यासंदर्भात जाणिवपूर्वक माहिती दिली जात नाही. अनेक कारखाने बाहेरुन ऊस आणतात. त्यांना वेगळा व कमी भाव देतात. आपण असा दुजाभाव करत नाही. याबाबत बोलण्याची दानत टीका करणारे दाखवित नाहीत. शासनाने शेतकर्यांना कबुल केलेले विविध अनुदाने अद्यापही दिले नाही. तसेच पाणी पट्टीतही तब्बल तीन पटीने वाढ केली आहे. यासंदर्भातही शेतकर्यांचे नेते अवाक्षरही काढीत नाही.अशोकवर टीका करणारे, आंदोलने करणार्यांमध्ये इतर कारखान्यांंवर जाऊन आंदोलन करण्याची हिम्मत नाही, असे श्री.मुरकुटे यांनी खडसावले.
माजी सभापती डॉ.वंदना मुरकुटे म्हणाल्या की, आपला कारखाना संगमनेर कारखान्याइतका भाव का देवू शकत नाही. चांगला साखर उतारा मिळाला असताना उसाला भाव मिळत नाही. मागील वर्षीच डिस्टीलरी सुरु करणार होतो, तसे झाले नाही. कारखान्यावरचे कर्ज वाढले. इथेनॉल प्रकल्प क्षमता वाढेल पण त्यासाठी मोलॅसिस कमी पडेल. ऊस विकास वाढीस प्रोत्साहन मिळावे, असे मुद्दे त्यांनी मांडले.
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले, रणजित बनकर, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे, शेतकरी संघटनेचे युवराज जगताप, अनिल औताडे, प्रा.कार्लस साठे, अॅड.श्रीकांत भणगे, अमर शिरसाठ आदींनी भाषणे करुन चर्चेत सहभाग घेतला.
याप्रसंगी ज्ञानेश्वर मुरकुटे, विनायक भालदंड, बाळासाहेब वाकचौरे, योगेश डंबीर (आडसाली), संजय कांडेकर, आप्पासाहेब अंबादास पटारे, शिवाजी तुवर (पूर्वहंगामी), मच्छिंद्र दळे, बाबासाहेब फरगडे, गिताराम पटारे (सुरु), राजेंद्र काळे, संजय तुवर, सुरज आदिक (खोडवा) या सभासदांना ऊस उत्पादकता पुरस्कार देण्यात आला. व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी स्वागत व श्रध्दांजली ठरावाचे वाचन केले. कार्यकारी संचालक संतोष देवकर यांनी सभेच्या नोटीसचे वाचन केले, तर पर्सेनेल मॅनेजर लव शिंदे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले.कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत यांनी अहवाल दुरुस्ती वाचन केले. सभेचे सूत्रसंचालन प्रा.दिलीप खंडागळे यांनी केले तर विरेश गलांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.