Monday, July 1, 2024
Homeक्राईममाजी आमदाराला मागितली 1 कोटीची खंडणी

माजी आमदाराला मागितली 1 कोटीची खंडणी

अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देणार्‍या दोघांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

अश्लील चित्रफित प्रसारित करुन राजकीय कारकीर्द उध्वस्त करण्याची धमकी देऊन आष्टीचे (बीड) माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून नगर शहरातील कोतवाली पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एक तथाकथित पत्रकार व एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेत माजी आमदार धोंडे यांच्या स्वीय सहायकाने तथाकथित पत्रकाराला 25 हजार रुपये दिले आहेत.
या संदर्भात इस्माईल दर्याणी उर्फ भैया बॉक्सर, कल्पना सुधीर गायकवाड (दोघेही रा. नगर) व बांगर (पूर्ण नाव पत्ता नाही) या तिघांविरुद्ध खंडणीखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील भैया बॉक्सर व कल्पना गायकवाड या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.

ही घटना जानेवारी 2024 ते 26 जून 2024 दरम्यान घडली. जानेवारीमध्ये माजी आमदार धोंडे यांच्या आष्टी येथील संपर्क कार्यालयात बांगर नावाची महिला त्यांना भेटली. तिने कल्पना गायकवाड हिने मला तुम्हाला भेटण्यासाठी पाठवले आहे, असे सांगून तुमची एक अश्लील चित्रफित माझ्याकडे आहे, कल्पना गायकवाडने ती मला दिली आहे, ती समाज माध्यमावर प्रसारित करुन तुमची राजकीय कारकीर्द उध्वस्त करायची नसेल तर तुम्ही माझ्याकडे 1 कोटी रुपये द्या, अन्यथा ती तुमच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करणार आहे, असा निरोप दिला.

त्यानंतरही दोघींनी वेळोवेळी माजी आमदार धोंडे यांना मोबाईलवरुन खंडणीची मागणी केली. त्यानंतर 11 मे 2024 रोजी नगर येथील टाइम्स ऑफ अहमदनगर या वेबपोर्टलवर इस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉक्सरने माजी आमदार धोंडे यांनी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याची बातमी प्रसारित केली. त्यावरून धोंडे यांचा स्वीय सहाय्यक जफर शेख यांनी भैय्या बॉक्सरशी संपर्क साधून खोटी बातमी लावू नको, असे सुनावले. त्यानंतर भैय्या बॉक्सरने बातमी हटवली. 14 मे 2024 रोजी भैय्या बॉक्सरने तुम्ही नगरला आल्यानंतर मला कळवा, समक्ष भेटल्यावर सर्व सांगतो असे सांगितले. त्यानंतर नगरमार्गे मुंबईकडे जाताना भैय्या बॉक्सरने मोबाईल करून नगर शहरातील स्टेट बँक चौकातील रॉयल हॉटेल येथे भेटण्यास बोलवले.

हे प्रकरण आपण देवाण घेवाण करून मिटवून टाकू, ती महिला माझ्या संपर्कात असून नगर येथेच राहते, मी सेटलमेंट करून देतो असे सांगितले. त्यावर माजी आमदार धोंडे यांनी भैय्या बॉक्सरला तुमची काय अपेक्षा आहे, असे विचारले असता कल्पना गायकवाडला 1 कोटी रुपयांची अपेक्षा आहे, त्यामध्ये काहीतरी तडजोड करून प्रकार मिटवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही मला काहीतरी द्या, असे तो म्हणाला. त्यानंतर स्वीय सहायक जफर शेखने माझ्या अपरोक्ष त्याला 25 हजार रुपये दिल्याचे सांगितले. त्यानंतर टाइम्स ऑफ अहमदनगर पोर्टलवर भैया बॉक्सरने गायकवाड या महिलेला हाताशी धरून माझ्या विरुद्ध खोटी बातमी लावून बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या