अंतापूर । वार्ताहर Antapur
बागलाण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार लहानु बाळा अहिरे (95) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी जाड (ता. बागलाण) येथील त्यांच्या मूळ गावी उद्या 1 मे रोजी करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने बागलाण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
माजी आमदार लहानू अहिरे यांच्या जन्म 1 जून 1930 रोजी गुजरात- महाराष्ट्र सीमेवरील जाड या दुर्गम आदिवासी गावात झाला होता. इयत्ता सातवी फायनल करून कृषी पदविकेचे कोसबाड येथे शिक्षण त्यांनी घेतले होते. गुजरात डांग येथे खाजूरण्या गावात शिक्षक व नंतर गरकुड( गुजरात) येथे तलाठी म्हणून त्यांनी सेवा केली होती.
स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब बिडकर, दलित मित्र माजी आमदार पंडित धर्माजी पाटील हे त्यांचे राजकीय क्षेत्रातील गुरु असल्याने 1984 मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. नंतर 1990 ते 95 या काळात काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर बागलाण विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून निवडून आले होते.
आमदारकीच्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा योजना, विज, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र इमारती बांधकाम आदी विकासात्मक कामे त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत साकारली होती. शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन आदिवासी सेवक पुरस्कार त्यांना प्रदान केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी गोतमा अहिरे, माजी जि.प. सदस्य गणेश अहिरे, लक्ष्मीकांत अहिरे, राजेंद्र अहिरे यांचे ते वडील होत.