नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :
तळोदा-शहादा विधानसभा मतदार संघाचे माजी आ. उदेसिंग पाडवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
सन 2014 च्या विधानसभा निवडणूकीत तळोदा-शहादा मतदार संघात उदेसिंग पाडवी हे भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. परंतू 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकिट कापून त्यांचे पूत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती.
त्यामुळे नाराज झालेल्या उदेसिंग पाडवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन नंदुरबार विधानसभा मतदार संघात डॉ.विजयकुमार गावित यांच्याविरुद्ध उमेदवारी केली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून श्री.पाडवी हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील, अशा चर्चा सुरु होत्या.
आज त्यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात जावून उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, ना.जयंत पाटील, ना.राजेश टोपे, आ.अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यांच्यासोबत त्यांचे पूत्र नितीन पाडवी, जामचे सरपंच मोहन शेवाळे, तोरणमाळचे सिताराम पावरा यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा हेमा शितोळे, लतेष पटेल आदी उपस्थित होते.