नाशिक | Nashik
जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभेसाठी (Dindori Loksabha) मतदारसंघातील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) माजी आमदार जे पी गावित (JP Gavit) यांच्यासह अनेकांनी आपले उमेदवारी आर्ज दाखल केले होते. त्यानंतर आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चव्हाण आणि गावित यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता दिंडोरी लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले असून या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे आणि महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यात लढत होणार आहे.
कालच माकपच्या राज्य सचिव मंडळाच्या झालेल्या ऑनलाईन बैठकीत दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या (BJP) उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी कॉ.जे. पी. गावित यांची उमेदवारी मागे घेण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज जे पी गावित यांनी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेत मविआचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे दिंडोरी मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचे टेन्शन वाढले होते. त्यानंतर अखेर आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चव्हाण यांनी तब्येतीचे कारण देत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार पवार यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.