Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVinayak Raut Family Dispute News : पतीचा हनिमूनवेळी शारीरिक संबंधास नकार, मासिक...

Vinayak Raut Family Dispute News : पतीचा हनिमूनवेळी शारीरिक संबंधास नकार, मासिक पाळीबाबत…; माजी खासदार विनायक राऊतांच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप

ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या कुटुंबावर (Family) त्यांच्या सुनेने अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. विनायक राऊत यांचे चिरंजीव तथा मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गितेश राऊत यांच्या पत्नी गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात (Kapurbawadi Police Station) याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून विनायक राऊत, गितेश राऊत यांच्यासह कुटुंबातील एकूण ७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, यामध्ये एका भोंदूबाबाचाही समावेश आहे. पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली आहे.

- Advertisement -

कौटुंबिक छळासह ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा

गिरीजा राऊत यांनी पोलिसांत (Police) दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचे म्हटले आहे. सासरच्या लोकांकडून गोमूत्र पाजणे, केस कापणे यांसारखे अघोरी प्रकार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात कौटुंबिक छळाच्या कलमांसोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ देखील गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस तक्रारीत नेमके काय आरोप केले?

मासिक पाळीबाबत पतीची विकृत वर्तणूक

तक्रारीत नमूद केल्यानुसार, पती गितेश राऊत (Gitesh Raut) हा पत्नीच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंद स्वतःच्या मोबाईलमध्ये ठेवून विकृतपणे वागत होता. तसेच विनायक राऊत हे खासदार असल्याने त्यांचे विविध राजकीय कार्यक्रम असायचे. या कार्यक्रमांना अडचण नको म्हणून सासू शामल राऊत आणि पती गितेश हे गिरीजा यांना मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेण्यासाठी जबरदस्ती करायचे, ज्यामुळे त्यांना आरोग्याचा मोठा त्रास सहन करावा लागला.

हनिमूनदरम्यान शारीरिक संबंधांना नकार

लग्नानंतर ऊटी येथे ६ दिवसांच्या हनिमूनसाठी गेले असता, पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. याबाबत विचारणा केली असता, “लग्नात शारीरिक संबंध महत्त्वाचे नसून मेंटल कनेक्ट महत्त्वाचा आहे, मला हनिमूनचा कंटाळा येतो,” असे म्हणून पतीने टाळाटाळ केल्याचा आरोप गिरीजा राऊत यांनी केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी अपमान आणि कौटुंबिक जाच

ऊटीवरून परतल्यानंतर मालवण येथील स्वागत समारंभासाठी जात असताना पालीच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबले. साडी आणि दागिन्यांमुळे गिरीजा यांना चालण्यास उशीर झाला. यावरून पतीने उपस्थित लोकांसमोर “तुला कुठेही घेऊन जाण्याची तुझी लायकी नाही,” अशा शेलक्या शब्दांत अपमान केला. तसेच सासू घरी असताना व नसताना अत्यंत वेगळी वागायची आणि माहेरच्या लोकांवरून सतत मानसिक त्रास द्यायची, असा आरोपही गिरीजाने केला आहे.

शारीरिक संबंधांविषयी पतीची अजब भूमिका

गिरीजा राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, पतीचे शारीरिक संबंधांबाबत अत्यंत अजब मत होते. “मी भारतात सेक्स करायला कम्फर्टेबल नाही, मी फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सला जाऊनच सेक्स करू शकतो,” असे तो म्हणायचा. मुंबईच्या किंवा मालवणच्या घरी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास आईला किंवा मदतनीसाला ऐकू जाईल, असे कारण सांगून तो दूर लोटायचा आणि मी नाजूक मुलगा आहे, मला हात लावायची तुला अक्कल आहे का? असे म्हणून बेदम मारहाण करायचा. तसेच खायला अन्नही दिले जात नव्हते, असा गंभीर आरोप सुनेने केला आहे.

पोलीस तपास सुरू

माजी खासदारांच्या कुटुंबावरच थेट सुनेने जादूटोणा आणि कौटुंबिक छळाचे गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबासह इतर संशयितांची चौकशी सुरू केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...