Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याआधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे महत्वाचे -.खा. सुरेश प्रभू

आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे महत्वाचे -.खा. सुरेश प्रभू

नाशिक | प्रतिनिधी

भविष्यात सहकार क्षेत्राला उज्वल दिशेकडे नेण्यासाठी सहकारातील मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याची गरज असून सहकार क्षेत्राने सर्वस्पर्शी जाणिवेतून काम करण्यासाठी एकत्रित विचारातून विकासाच्या संकल्पना रूजवाव्यात. त्यासाठी काळाबरोबरच बदलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे तितकेच महत्वाचे आहे.

- Advertisement -

तंत्रज्ञान, मार्केटिंग याबरोबरच सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे व संस्थेचा विकास यांचा समतोल राखणे संस्थेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व ठरेल. समाजाचा विकास करण्यासाठी ग्राहकांशी वैयक्तिक पातळीवर नाते जोडून बँकांनी ग्राहकाभिमुखता जपावी. सहकार ही उद्याच्या काळाची गरज आहे ती अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी आत्मपरिक्षण करण्याबरोबरच सहकारातील सात्विकता जपावी. सहकार हे उद्याच्या जगाचे प्रभावी माध्यम असेल. असे प्रतिपादन माजी रेल्वे मंत्री, तथा चेअरमन-न्यू ड्राफ्ट पॉलिसीचे .खा. सुरेश प्रभू यांनी केले.

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. सन २०२१-२२ चा २५ वा (रौप्य महोत्सवी) पुरस्कार वितरण सोहळा ‘गुरूदक्षिणा’ सभागृहात झाला. २४ वर्षांनंतर प्रथमच मुंबई बाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा झाला.

प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे म्हणाले की, सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी संयुक्त प्रेरणेच्या जाणिवेतून एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. सध्याचे युग हे स्पर्धात्मक असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच युवा पिढीचा सहभाग घेणे म्हणजेच सहकाराच्या समृद्धीची यशस्वी वाटचाल करेल.

सहकाराची पारदर्शकता, विश्वासार्हता आणखी गतीमानतेने वाढवण्यासाठी नागरी सहकारी बँकांनी स्वयंपूर्णतेणे काम करण्याबरोबरच व्यवस्थापनातील सिद्धता, कौशल्य विकास, मुल्य व्यवस्था, सामाजिक योगदान, सामाजिक दायित्व यांचा अंगीकार करावा.

कुशल मनुष्यबळ हे संस्थेच्या गुणात्मक वाटचाल गतीमान होण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे. त्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळांमार्फत बँकांचा आधुनिक वाटचालीचा मार्ग सुकर होईल. पुरस्कार म्हणजे आपल्या कामाची पोचपावती असते व त्यातून पुढील वाटचालीला बळ मिळत असते. त्यासाठी सहकारात काम करणार्यांनी ध्येय निष्ठेने काम करावे.

फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे,पुरस्कारार्थींच्यावतीने कै. विष्णू अण्णा पाटील जीवनगौरव पुरस्काराबद्दल अरविंद पोरेड्डीवार, सुशिलादेवी देशमुख स्मृती पुरस्काराबद्दल कमलादेवी विजयकुमार राठी व सहकार महर्षि बाळासाहेब घुईखेडकर उदयोन्मुख तरुण सहकारी पुरस्काराबद्दल शरण बसवराजजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनचे उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांनी केले.

प्रास्ताविक करताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने असोसिएशनच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत असलेल्या वाटचालीचा अभ्यासपूर्ण वेध घेणार्या सन्मानार्थी स्मरणिकेचे तसेच असोसिएशनचे मुखपत्र असलेल्या ‘क्षितिज’च्या अंकाचे प्रकाशन उपस्थितांच्या शुभहस्ते संपन्न झाले. व वेबसाईटच्या नूतनीकरणाचे उद्घाटन झाले.

सूत्रसंचलन डॉ. चंद्रकांत संकलेचा, मंगेश पंचाक्षरी व डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. आभार प्रदर्शन असोसिएशनचे संचालक राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास असोसिएशनचे संचालक गुलाबराव देवकर, डॉ. दिगंबर दुर्गाडे, प्रंचित पोरेड्डीवार, रूपा देसाई-जगताप, भाऊ कड, सुभाष जोशी, रविंद्र दुरुगकर, कैलास जैन, जगन्नाथ बिंगेवार, राजेंद्र महल्ले, दिलीप चव्हाण, योगिनी पोकळे, किशोर रांगणेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आव्हाड उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या