श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
गेल्या आठवड्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शहरालगतच्या एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या आपल्या बायकोचा दारुण पराभव झाल्याने निराश झालेल्या एका माजी सरपंचाने दोन दिवसांपूर्वी रात्री दारू पिऊन विरोधी गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना फोन करून शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यात चर्चिली जात आहे.
मागील रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या असलेले पालकमंत्र्यांच्या गटाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार्या सरपंच पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. हा पराभव त्यांच्या पतीच्या खुपच जिव्हारी लागला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांनी रात्री दारू पिऊन विरोधी गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. सदर शिवीगाळ काही कार्यकर्त्यांच्या घरातील लोकांनी ऐकल्यानंतर त्यांनी त्याला जाब विचारला. दुसर्या दिवशी या सर्व कार्यकर्त्यांनी संबंधित पॅनलच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घातला आणि त्यांना निर्वाणीचा इशारा दिला. पॅनल प्रमुखांनी सुद्धा संबंधित माजी सरपंचाला बोलावून घेऊन त्याची चांगलीच कानउघाडणी केली. त्यामुळे सध्या तरी त्यांनी गप्प राहण्याचे धोरण घेतले आहे.
वास्तविक पाहता निवडणुकीमध्ये आपला पराभव का झाला? लोकांनी आपल्याला का नाकारले? याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल मान्य करून आपल्या चुका दुरुस्त करून पुढे जायचे असते. हे सुद्धा यांना माहीत नाही. उलट रागाच्याभरात त्यांनी विरोधी गटाच्या निवडून आलेल्या सरपंचाच्या कार्यकर्त्यांना अशी घाणेरडी शिवीगाळ करून स्वतःचे हसू करून घेतले आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये हा एक मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.
स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चुरशीने होतात. एक जण निवडून येतो इतर जण पराभूत होतात. परंतु खिलाडू वृत्तीने निवडून आलेल्या उमेदवाराचे अभिनंदन करून जनतेचा कौल मान्य करून पराभव स्विकारून पुढची वाटचाल आपण केली पाहिजे, हे त्यांना कोणीतरी सांगण्याची गरज आहे, असे मत सत्ताधारी गटातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.