मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
महाराष्ट्राच्या (Maharashtra) स्थापनेपासून काँग्रेस सरकारने (Congress Government) आखलेल्या ध्येय धोरणांमुळे महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिलेले राज्य आहे. परंतु मागील काही वर्षात भाज सरकारमुळे महाराष्ट्राची सर्वच आघाड्यांवर पिछेहाट झाली. महाराष्ट्राचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने गुंतवणूक व रोजगारही गेले. शेतकरी संकटात असल्याने आत्महत्या वाढल्या आहेत. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण झाली असून कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा ही राज्ये पुढे गेली आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी शनिवारी येथे केली. महाराष्ट्रातील भाजप युती सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप करत त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन करून महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचे आवाहन केले.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना पी. चिदंबरम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर शरसंधान सोडले. भाजपच्या राजवटीत महाराष्ट्राची अधोगती कशी झाली हे त्यांनी आकडेवारीसह सविस्तरपणे सांगतिले. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ९.६ वरून ७.६ टक्क्यावर घसरले आहे. कृषी क्षेत्रात ४.५ टक्क्यांवरून १.९ पर्यंत घसरण झाली आहे. सेवाक्षेत्रात १३ टक्क्यावरून ८.८ टक्के, बांधकाम क्षेत्रात १४.५ टक्क्यांवरून ६.२ टक्के घरसण झालेली आहे. वित्तीय तूट वाढली असून सरकार पैसे खर्च करत आहे, पण कोणत्याही क्षेत्रात वृद्धीदर वाढलेला दिसत नाही.
महाराष्ट्रात (Maharashtra) आज बेरोजगारीची समस्या अत्यंत बिकट असून बेरोजगारीचा दर १०.८ टक्के आहे. पगारी नोकरी करणाऱ्यांच्या संख्येत ४० टक्क्यावरून ३१ टक्क्यांपर्यंत पर्यंत घरसण झाली आहे. तर ४० टक्के लोक स्वयंरोजगार करत आहेत. १८ हजार पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) ११ लाख अर्ज आले होते. तर ४ हजार ६०० तलाठी पदांसाठी ११.५ लाख लोकांनी अर्ज केले होते. यातून बेकारीची अवस्था किती गंभीर आहे हे स्पष्ट होते, असे चिदंबरम म्हणाले. महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार का मिळत नाहीत यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच म्हणाले की, राज्यात नोकऱ्या आहेत कुठे? महाराष्ट्रातील तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी येत्या २० तारखेला मतदान करताना नितीन गडकरी यांचे ‘नोकऱ्या कुठे आहेत?’ हे वक्तव्य लक्षात ठेवूनच मतदान करावे, असे आवाहनही चिदंबरम यांनी यावेळी केले.
देशाची अर्थव्यवस्था (Economy) पाच ट्रिलियन डॉलर आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. याकडे लक्ष वेधले असता, भाजप सरकारने (BJP Government) ५ ट्रिलीयनचे लक्ष्य गाठण्यासाठी दिलेली कालमर्यादा वाढवली आहे. सन २०२२-२३ या वर्षात हे लक्ष्य गाठले जाणार होते आणि ते गाठणे अशक्य नाही. केव्हातरी हे लक्ष्य गाठलेच जाईलच. पण प्रश्न असा आहे की ते लक्ष्य गाठण्यासाठी लागणार वेग. हा वेग मात्र मंद आहे. लक्ष्य गाठताना लक्ष्य नाही तर वेग महत्वाचा आहे, असे पी. चिदंबरम म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा