Wednesday, April 9, 2025
HomeनगरAhilyanagar : शिर्डीत पकडलेल्या चौघा भिक्षेकरूंचा उपचारादरम्यान नगरमध्ये मृत्यू

Ahilyanagar : शिर्डीत पकडलेल्या चौघा भिक्षेकरूंचा उपचारादरम्यान नगरमध्ये मृत्यू

जिल्हा रूग्णालयातील प्रकार || चौकशीसाठी समिती गठीत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

श्रीराम नवमीनिमित्त (Shri Ram Navami) शिर्डीत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ताब्यात घेतलेल्या भिक्षेकरूंपैकी (Beggars) चारजणांचा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला आहे. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील (District Hospital) वैद्यकीय यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून उपचारांतील संभाव्य हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांच्या आदेशानुसार चौकशी समिती स्थापन केली आहे. दरम्यान, मयत झालेले सर्वजण भिक्षेकरू (Beggars) हे अल्कोहोल रिव्हर्स सिंड्रोमने (Alcohol Syndrome) पीडित होते. त्यांची दारू अचानक बंद झाल्याने त्यांच्यावर मानसिक व शारिरिक परिणाम होऊन त्यात ते अत्यवस्थ होऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी विसापूर (Visapur) (ता. श्रीगोंदा) येथील भिक्षेकरी गृहातील अत्यावस्थ दहाजणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असलेल्या भिक्षेकरूंपैकी अशोक मन्साराम बोरसे (वय 35), सारंधर मधुकर वाघमारे (वय 48), प्रवीण अण्णा घोरपडे (वय 48) आणि इस्सार अब्दुल शेख (वय 38) यांचा मृत्यू झाला. यातील एकाचा मृत्यू सोमवार, 7 एप्रिल रोजी झाला असून उर्वरित तिघांनी मंगळवार, 8 एप्रिल रोजी प्राण सोडले. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन आज, बुधवारी करण्यात येणार असून, त्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस (Shirdi Police), नगरपरिषद आणि साई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील भीक मागणार्‍यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेत 50 हून अधिक भिक्षेकरूंना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील भिक्षेकरी गृहात ठेवण्यात आले होते. मात्र, तेथे असताना 10 भिक्षेकरूंची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरू असताना चारजणांचा मृत्यू झाल्याने रूग्णालय प्रशासनावर उपचारातील दुर्लक्षाचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, उपचार घेत असलेल्या भिक्षेकरूंपैकी चौघेजण रूग्णालयातून पलायन करण्यात यशस्वी झाले असून, उर्वरित दोन रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतरच या प्रकरणातील सत्य परिस्थिती उघड होईल.

चौकशीसाठी चौघांची समिती
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत पाठक यांची नियुक्ती करण्यात आली असून, सदस्य म्हणून डॉ. शिवशंकर वलांडे, डॉ. दर्शना धोंडे-बारवकर आणि कनिष्ठ लिपिक दत्तात्रय धाडगे यांचा समावेश करण्यात आला आहे.समितीने सात दिवसांच्या आत संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करून आवश्यक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि निष्कर्षासह अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अल्कोहोल रिव्हर्स सिंड्रोम कारण
ज्या व्यक्ती दीर्घकाळ मद्यपानानंतर अचानक मद्यपान बंद केल्याने किंवा कमी केल्याने होणार्‍या शारीरिक आणि मानसिक लक्षणांच्या समूहाला अल्कोहोल रिव्हर्स सिंड्रोम म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ मद्यपान करते, तेव्हा मद्यपान बंद केल्यावर किंवा कमी केल्यावर तिच्या मेंदूला त्याचे दुष्परिणाम जाणवतात. यामुळे चिंता, नैराश्य, स्नायू दुखणे, कंप (थरकाप), झोप न लागणे आणि गंभीर स्थितीत भ्रम आणि फेफरे येऊ शकतात. अल्कोहोलमुळे मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर आणि रसायनांमध्ये बदल होतात. जेव्हा मद्यपान अचानक बंद केले जाते, तेव्हा मेंदू या बदलांशी जुळवून घेण्यासाठी त्रासतो, ज्यामुळे ही लक्षणे दिसू लागतात.

उपचार सुरू असताना झाला मृत्यू
शिर्डीत पकडलेल्या दहा भिक्षेकरूना त्रास झाल्याचे विसापूरच्या भिक्षेकागृहातील डॉ. तूरमाने यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने दहा रुग्णांना पुढील उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवले. त्या ठिकाणी दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होता. वाढलेली उष्णता आणि डिहायड्रेशन तसेच अल्कोहोल रिव्हर्स सिंड्रोममुळे हे रुग्ण अत्यावस्थ झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना आधी एक तर मंगळवारी तीन असे चौघा भिक्षेकरूनचा मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दोघांवर उपचार, चौघे फरार
दरम्यान, सध्या अतिदक्षता विभागात दोघांवर उपचार सुरू आहेत. तर चौघे भिक्षेकरू जिल्हा रुग्णालयातून पळून गेले आहेत. अल्कोहोल रिव्हर्स सिंड्रोममुळे व्यसनी व्यक्तीच्या शरिराच्या विविध भागावर परिणाम होऊन त्याचे वेगवेगळे अवयव निकामी होऊन मृत्यू ओढावतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाकडून सांगण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शाळेत मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ दाखवून मुलीची छेडछाड

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी शहरातील एका शाळेत शिक्षकाने मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ दाखवून छेडछाड केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात शिक्षकावर पोक्सो व अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल...