धुळे – Dhule – प्रतिनिधी :
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दि.24 ते 27 जुलै दरम्यान धुळे महापालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. कर्फ्यू कालावधीत मेडिकल व फक्त घरपोच दूध सेवा यांना सवलत देण्यात आली आहे. तर भाजीपाला, फळविक्री, किराणा ही सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील.
शहरात कोरोना महामारीने कहर केला आहे. दिवसेंदिवस झपाट्याने रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे उपाययोजना करण्यासाठी व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, महापालिका पदाधिकारी, अधिकारी, पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक आज घेण्यात आली. अध्यक्षस्थानी महापौर चंद्रकांत सोनार हे होते. बैठकीला आयुक्त अजीज शेख, भाजपा महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ आदी उपस्थित होते.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मनपा व पोलीस यंत्रणेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना करुनही नागरिकांची गर्दी कमी होतांना दिसून येत नाही. सोशल डिस्टन्सींग पाळले जात नाही. मास्कचा वापर न करता विनाकारण रस्त्यावर गर्दी केली जाते यामुळे रुग्ण संख्येचा धोका वाढला आहे.
म्हणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात दि.24 जुलैच्या दुपारी 4 ते 27 जुलैच्या सकाळी 8 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्फ्यूमध्ये मेडीकल व फक्त घरपोच दूध सेवा यांना सवलत देण्यात आली आहे. तर भाजीपाला, फळविक्री, किराणा ही सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील. नागरीकांना या कालावधीत घराच्या बाहेर पडता येणार नाही.