Sunday, June 23, 2024
Homeनगरचारचाकी वाहन चोरांची टोळी लोणी पोलिसांकडून जेरबंद

चारचाकी वाहन चोरांची टोळी लोणी पोलिसांकडून जेरबंद

लोणी |वार्ताहर| Loni

- Advertisement -

लोणी, राहुरी आणि शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहनांची चोरी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात लोणी पोलिसांना यश आले आहे.

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील मणियार गल्लीतून 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री फिरोज बशीर मणियार यांचा महेंद्रा कंपनीचा मालवाहू पिकअप किराणा सामानासह घरासमोरून चोरी झाला होता. त्याची तक्रार लोणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 431/21 नुसार दाखल करण्यात येऊन सहा. फौजदार मरभळ हे तपास करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर पिकअप खंडाळा, ता. श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी फारुख हसन सय्यद याला पिकअपसह ताब्यात घेतले. स.पो.नि. समाधान पाटील यांनी आरोपी फारुख याला बोलते केले. त्याने साकुरी येथील साईल पांडुरंग बनसोडे आणि शिर्डी येथील दौलत यशवंत कदम यांच्याकडून पिकअप घेतल्याची कबुली दिली. लोणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले व चोरी झालेला पिकअप, 4 हजार 360 रुपयांचे किराणा सामान हस्तगत केले.

या आरोपींनी राहुरी पोलीस ठाणे व शिर्डी पोलीस ठाणे येथून चारचाकी वाहने चोरल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलिसांनी वाहन चोरांची टोळी जेरबंद केल्याने त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या