अहिल्यानगर |सचिन दसपुते| Ahilyanagar
कमी कालावधीत दामदुप्पट किंवा त्याहून अधिक परतावा मिळेल, अशा आमिषांनी नागरिकांची आर्थिक फसवणूक करणार्या योजनांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकाचे उद्दिष्ट संभाव्य फसवणूक योजनांबाबत माहिती संकलन करून स्वतःहून (सुमोटो) गुन्हा दाखल करणे, तसेच जनजागृतीव्दारे नागरिकांना सावध करणे हे आहे.
पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार आणि विधानपरिषद लक्षवेधी क्रमांक 57 अंतर्गत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे नेतृत्व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक गणेश उगले करणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस अंमलदार बी. एन. जंबे, वाय. बी. घोडके, महिला पोलीस अंमलदार आर. एस. कवडे व जे. एच. म्याना यांचा समावेश आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात अलीकडील काळात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पतसंस्था, मल्टिनिधी कंपन्या, शेअर मार्केट कंपन्या आणि निधी लिमिटेड कंपन्या नागरिकांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडतात. काही कालावधीनंतर या कंपन्या अचानक बंद पडतात किंवा पैसे परत देण्यास टाळाटाळ करतात. परिणामी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेचे हे विशेष पथक अशा योजनांवर सतत लक्ष ठेवून असणार आहे. याशिवाय, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम, कार्यशाळा आणि प्रचार मोहीम राबवण्यात येणार आहे. फसवणूक रोखण्यासाठी माहिती संकलन, तपास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर भर देण्यात येणार आहे. अधिक परताव्याच्या आमिषांना बळी न पडता अशा संशयास्पद योजनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने नागरिकांना केले आहे.
…तर ‘सुमोटो’ गुन्हा दाखल होणार
या पथकाच्या कार्यवाहीचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंपनी अथवा संस्थेविरोधात स्वतःहून (सुमोटो) गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव तयार करून तो नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर पोलीस स्वतः फिर्यादी होऊन संबंधित फसवणूक करणार्यांविरोधात गुन्हा दाखल करू शकतात.