अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून हुबेहूब बनावट लेटरहेड तयार करत बँक खात्याचे तपशील बदलून तब्बल 13 लाख 56 हजार 957 रुपयांची फसवणूक करणार्या सायबर गुन्हेगारांच्या कारनाम्याला नगर सायबर पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून संबंधित बँकांशी समन्वय व पाठपुरावा केल्याने फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम फिर्यादी कंपनीला परत मिळवून देण्यात यश आले आहे.
या प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांची कंपनी एका मोठ्या ग्राहक कंपनीला माल, वस्तू अथवा सेवा पुरविण्याचे काम करते. या ग्राहक कंपनीकडून फिर्यादींच्या कंपनीला पुरविलेल्या साहित्याचे पेमेंट येणे बाकी होते. ही बाब हेरून अज्ञात सायबर गुन्हेगारांनी फिर्यादींच्या कंपनीचा ई-मेल आयडी हॅक केला. त्यानंतर कंपनीच्या मूळ लेटरहेडशी हुबेहूब साधर्म्य असलेले बनावट लेटरहेड तयार करून त्यावर बँक खात्याचे तपशील बदलण्यात आले. बदललेल्या बँक खात्याच्या माहितीसह बनावट चेक तयार करून तो ग्राहक कंपनीला ई-मेलद्वारे पाठविण्यात आला. या ई-मेलमध्ये बँक खात्याचे तपशील बदलल्याचे सांगून पुढील पेमेंट नव्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडीवरून मेसेज आल्याने ग्राहक कंपनीने त्यावर विश्वास ठेवला. त्यानुसार दोन वेळा एकूण 13 लाख 56 हजार 957 रुपयांची रक्कम पाठविण्यात आली.
मात्र, ही रक्कम फिर्यादींच्या कंपनीच्या मूळ बँक खात्यात जमा न होता सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या खात्यात जमा झाली. अशा प्रकारे कंपनीची मोठी आर्थिक फसवणूक झाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगर सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. फसवणुकीची रक्कम कोणत्या बँक खात्यांमध्ये जमा झाली, याची माहिती घेऊन संबंधित बँकांशी संपर्क साधण्यात आला. आवश्यक कागदपत्रे व माहितीच्या आधारे बँकांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पोलिसांच्या तत्परतेमुळे फसवणूक झालेली संपूर्ण 13 लाख 56 हजार 957 रुपयांची रक्कम फिर्यादींना परत मिळवून देण्यात यश आले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, पोलीस अंमलदार आप्पासाहेब हिंगे व इतर पोलीस अंमलदारांनी केली.
फुंदेचे अनेक कारनामे
सायबर गुन्हेगारांकडून आता केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच नव्हे, तर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या व व्यापारी संस्थांनाही लक्ष्य केले जात आहे. कंपनीचे अधिकृत ई-मेल हॅक करून त्याच ई-मेल आयडीवरून बँक खाते बदलल्याचे संदेश पाठविले जातात. बनावट लेटरहेड व चेकच्या माध्यमातून व्यवहाराची विश्वासार्हता निर्माण केली जाते. त्यामुळे कंपन्यांनी ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या बँक खाते बदलाच्या सूचनांवर केवळ विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नयेत. संबंधित पुरवठादार किंवा ग्राहक कंपनीशी अधिकृत आणि प्रत्यक्ष फोनवर संपर्क साधून खात्री केल्यानंतरच पैसे पाठवावेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.




