अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पोलीस असल्याची बतावणी करत पुजारी काम करणार्या वृध्दाकडून तीन लाख 39 हजार रुपये किमतीचे सुमारे पावणे सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने काढून घेतले आहेत. सदरची घटना मंगळवारी (15 ऑक्टोबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास क्लेरा ब्रुस शाळेच्या समोरील रस्त्यावरील स्पीड ब्रेकरच्या जवळ घडली. याप्रकरणी दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयशंकर मुलचंद मिश्रा (वय 61 रा. सुभद्रानगर जवळ, अरणगाव रस्ता, अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी फिर्याद दिली आहे.
मंगळवारी सकाळी विजयशंकर हे शैलेश जाजु यांंच्या रूपाली एजन्सी, तापकिर गल्ली या होलसेल विक्रीच्या दुकानात पुजा करण्याकरिता जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तींनी क्लेरा ब्रुस मैदानाच्या समोर रस्त्यावरील स्पीड ब्रेकरच्या जवळ विजयशंकर यांना थांबविले. पोलीस असल्याची बतावणी केली व भुरळ पाडून त्यांच्या गळ्यातील पावणे तीन तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट, तीन तोळ्याच्या सोन्याच्या टिकल्या व रूद्राक्ष मणी असलेली माळ, एक तोळ्याच्या चार अंगठ्या असा तीन लाख 90 हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला.
सदरचे दागिने त्या दोघांनी दुचाकीतील पिशवीत ठेवले. विजयशंकर यांची नजर चुकवून सोन्या ऐवजी त्यांच्या हातात कागद दिला. त्यात चार दगडी खडे असल्याचे आढळून आले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे विजयशंकर यांच्या लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे करत आहेत.
चोरट्याने साडेचार हजारांची रोकड, दोन मोबाईल व एटीएम कार्ड असा 25 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सदरची घटना शनिवारी (12 ऑक्टोबर) रात्री पावणे बारा ते रविवारी (13 ऑक्टोबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी मोहिनी किसनराव पालवे (वय 29) यांनी मंगळवारी (15 ऑक्टोबर) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार दीपक जाधव अधिक तपास करत आहेत.