नाशिक। प्रतिनिधी Nashik
राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमीष दाखवित तामिळनाडूतल्या एका विभूषित शास्त्रज्ञाला सहा कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नाशिकच्या महाठगास नाशिक शहर पाेलिसांनी अटक केली आहे. निरंजन सुरेश कुलकर्णी (वय ४०, रा. सेवन श्री अपार्टमेंट, गंधर्व नगरी, नाशिकरोड) असे संशयित ठगबाजाचे नाव आहे. नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेने त्याला नागपुरातून बेड्या ठोकल्या. राज्यपाल पद देण्यासाठी त्याने तब्बल पंधरा कोटी रुपयांचे ‘सेवाशुल्क’ मागितल्याचेही पाेलीस तपासात उघड झाले आहे.
तामिळनाडू राज्यातील चेन्नईतील व्यावसायिक व शास्त्रज्ञ नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी (वय ५६) यांनी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिली होती. राजकीय ओळखींचा दावा करु संशयिताने रेड्डींना आमीष दाखविले. कुलकर्णीच्या दाव्यांवर विश्वास त्यांनी ठेवला. त्यावेळी त्याने कुठल्याही छाेट्या माेठ्या राज्याचे गव्हर्नर पद मिळवून देऊ शकतो. असे सांगण्यात आले होते. रेड्डी यांनी ७ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२४ या कालावधीत संशयिताला ५ कोटी ८ लाख ९९ हजार ८७६ रुपये दिले आहेत. त्यापैकी साठ लाख रुपये रोख रक्कम असून, उर्वरित पैसे स्वत:सह नातलगांच्या बँक खात्यातून रेड्डींनी संशयिताच्या बँकेत जमा केले.
संशयित काही दिवसांपासून नागपूर येथे फिरत होता. पोलिसांना गुंगारा देत नागपुरात एका मित्राकडे व हॉटेलात लपला. पथकाने त्याला ताब्यात घेतले. गुन्ह्याची व्याप्ती व फसवणुकीचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. दाखल तक्रारीनुसार पथक रवाना करुन त्याला गजाआड केले आहे. सखाेल तपास सुरु आहे.
संदीप मिटके, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे