Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशकातील तडीपारांचा बिनधास्त वावर

नाशकातील तडीपारांचा बिनधास्त वावर

नाशिक । Nashik

शहर तसेच परिसरात तडीपारांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात तडीपार शहरात आढळून आले आहेत. अशाच एका तडिपाराने नववर्षस्वागतालाच एका युवकास कोयता दाखवत लुटल्याचा प्रकार समोर आल्याने तडिपारांना पोलीसांची भिती उरली नसल्याची चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

शरिर तसेच मालाविरूद्धचे पाच पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारास अथवा टोळीस शहरातील कायदा व्यवस्थेच्या कारणावरून तडीपार करण्याचे अधिकार पोलीस उपायुक्तांना आहेत. करोना लॉकडाऊननंतर अचानक वाढलेली शहरातील गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी मागील वर्षभरात परिमंडळ 1 व परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्तांनी मोठ्या प्रमाणात गुंड तसेच टोळ्यांची तडीपारी केली आहे.

अशा तडीपारांचा आकडा मोठा असून तडीपार केल्यानंतर त्यांना शेजारील अहमदनगर, ठाणे, नंदुरबार, पुणे या जिल्ह्यांचे पर्याय देऊन तिकडे पोहच केले जाते. परंतु पोलीसांची पाठ फिरताच सबंधीत गुंड पुन्हा नाशिक शहरात येऊन आपल्या परिसात राजरोसपणे राहत असल्याचे चित्र आहे.

त्याच्याबाबत खबर्‍याने माहिती दिली तरच तो पकडला जातो अन्यथा असे गुंड दिवसा ढवळ्या आपल्या टोळक्यांबरोबर शहरात वावरताना दिसतात. पंधरा दिवसांपुर्वी पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी अचानक राबवलेल्या मिशन सर्जीकल स्ट्राईकमध्ये अनेक तडीपार पोलीसांच्या हाती लागले. तर गुन्हे शाखांनी वेळोवेळी असे तडीपार पकडून त्या त्या पोलीस ठाण्यांच्या हवाली केले आहेत.

शहरातील कायदा सुवव्यस्थेमुळे तडिपार केलेले शहरात दाखल होऊन त्यांच्या कारवाया करत असल्याचे समोर आले आहे. अशीच एक घटना 31 डिसेंबरला रात्री गणेशवाडीत घडली येथे घराबाहेर बसलेल्या एका युवकास तडिपार विकी किशोर बजाज (रा.गणेशवाडी) व श्रीकांत उर्फ टकल्या मुकणे (रा.पंचवटी) यांनी मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवत लूटले. या घटनेत 17 हजार 300 रूपयेंची रक्कम त्यांनी बळजबरीने काढून नेली.

याप्रकरणी दिनेश मिलींद सनान्से (20 रा.शेरेमळा,गणेशवाडी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. यावेळी संशयीतांशी झालेल्या झटापटीत सनान्से याच्या कपाळास कोयत्याची मुठ लागल्याने दुखापत झाली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तडीपारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरीक करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या