अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणार्या शेतकर्यांना आता राज्य सरकारच्यावतीने ई-पीक पाणी सक्तीची करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात आंबिया बहार फळपीक विमा योजनेत 2 हजार 331 शेतकर्यांनी अर्ज केले असून या सर्वांना ई-पीक पाणी करण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. पुनर्रचित हवामान आधारित विमा योजना 12 जून 2024 पासून राबविण्यात येत असून या योजनेत राज्य सरकारच्या वतीने भारतीय कृषी विमा कंपनी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनीयांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
या कंपनीमार्फत फळपीक विमा योजना यामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, चिकू, पेरू, सिताफळ व लिंबू या आठ फळ पिकांसाठी 26 जिल्ह्यांमध्ये मृग बहार तर 2024- 25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्षे, आंबा व पपई स्ट्रॉबेरी या 9 फळ पिकांसाठी ही हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकर्यांना पीक पाणी सक्तीची करण्यात आली असून त्यांनी येत्या 25 एप्रिलपर्यंत डिजिटल क्रॉप सर्वे या अॅपवर नोंदणी केलेली नसल्यास त्यांना विमा योजनेचा लाभ मिळणार नसण्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आली. यामुळे या योजनेत अर्ज केलेल्या शेतकर्यांनी ई-पीक पाणी करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
असे आहेत तालुकानिहाय अर्ज
अकोले 5, जामखेड 16, कोपरगाव 12, नगर 84, नेवासा 143, पारनेर 122, पाथर्डी 743, राहाता 49, राहुरी 33, संगमनेर 91, शेवगाव 113, श्रीरामपूर 38 अशा 2 हजार 331 शेतकर्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात मृत बहार फळपिक योजनेत दरवर्षी सरासरी 13 हजार शेतकरी सहभागी होतात. आंबिया बहारमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण जिल्ह्यात कमी आहे.