Friday, June 14, 2024
Homeब्लॉगमॉलवाला भाजीपाला!

मॉलवाला भाजीपाला!

कोरोना किंवा कोविड 19 हा सध्या सर्वाधिक चर्चेचा आणि तितकाच चिंतेचा विषय झाला आहे. या विषाणूमुळे संपूर्ण जगाच्या अर्थकारणावर प्रचंड मोठा प्रभाव निर्माण झाला आहे. कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थकारण इतक्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होण्याचे मुख्य कारण म्हणजे कधीही न थांबणारी विमान वाहतूक, जहाज वाहतूक ,रेल्वे वाहतूक, माल वाहतूक, प्रवासी वाहतूक थांबवावी लागली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार देखील मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. व्यापार मंदावल्यामुळे मागणी आणि पुरवठा ची साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे शेती, कारखानदारी आणि सेवा क्षेत्रातील अनिश्चिततेची परिस्थिती अधिकच गडद झाली आहे .

- Advertisement -

कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रात दुष्परिणाम झाले असले तरी काही क्षेत्रांसाठी ही इष्टापत्ती ठरेल असे वाटते. कोणकोणत्या क्षेत्रावर कोरोना चे नेमके काय परिणाम झाले? हे काळाच्या ओघात हळूहळू स्पष्ट होईल. सध्या मात्र कृषी क्षेत्राशी संबंधित होतकरू आणि व्यावसायिक दृष्टिकोन असणार्‍या तरुण वर्गासाठी एक कायम स्वरूपाचे रोजगाराचे किंवा व्यवसायाचे क्षेत्र खुणावत आहे असे वाटते. या क्षेत्राविषयी चर्चा करण्या अगोदर थोडी पार्श्वभूमी लक्षात घेऊयात!

विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात भारतात सुरू झालेल्या जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण ज्याला आपण नवीन आर्थिक धोरण असे म्हणतो, या धोरणाचा परिणाम घराघरापर्यंत पोहोचला आहे. हा परिणाम केवळ आर्थिक क्षेत्रापुरता मर्यादित राहिला नसून इतर क्षेत्रांवर देखील त्याचा प्रभाव पडला आहे. या नवीन आर्थिक धोरणामुळे भारतात संपूर्ण आर्थिक घडामोडींवर प्रभाव पाडू शकेल इतक्या मोठ्या प्रमाणात मध्यमवर्ग खरेदी शक्ती असणारा वर्ग निर्माण झाला आहे.

या मध्यमवर्गाच्या खरेदी शक्तीचा विचार करून अनेक क्षेत्रात बदल झाले आहेत आणि हे बदल भविष्यात देखील होऊ घातले आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर पूर्वी लहान लहान स्वरूपात चालणारी किराणा दुकाने आज हळूहळू बंद होऊन त्यांची जागा सुपर शॉपी किंवा मॉल घेताना दिसत आहेत .कापड दुकानांच्या बाबतीत देखील कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे खरेदी शक्ती असणार्‍या मध्यमवर्गाला चांगल्या दर्जाच्या आणि विविध प्रकारच्या वस्तू एकाच छताखाली हव्या आहेत .

सद्यस्थितीतील कोरोना, नवीन आर्थिक धोरण आणि मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा या पार्श्वभूमीचा एकत्रित विचार करता भारतातील फळे आणि भाजीपाला यांच्या किरकोळ विक्रीचे स्वरूप येत्या काळात मोठ्या प्रमाणात बदलेल अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. भारताच्या बाबतीत विनोदाने असे म्हटले जाते की या कृषिप्रधान देशात चप्पल वातानुकूलित दुकानांमध्ये आणि फळे व भाजीपाला मात्र रस्त्यारस्त्यांवर विकला जातो. यामध्ये तथ्य देखील आहे.

परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भितीने रस्त्यावरील फळे आणि भाजीपाला खरेदी करण्याची अनेक नागरिकांची इच्छा होताना दिसत नाही. त्यामुळेच नजीकच्या काळात रस्त्यावर विकला जाणारा फळे व भाजीपाला छोट्या-मोठ्या मॉलमध्ये जाईल. दुसरीकडे व्यापार मंदावल्याने बाजारपेठेतील अनेक गाळे ओस पडू लागले आहेत. नेमकी हीच परिस्थिती तरुण आणि होतकरू शेतकर्‍यांसाठी कायम स्वरूपाच्या व्यावसायिक संधी घेऊन आली आहे.

फळे आणि भाजीपाला हा अत्यावश्यक घटक आहे. त्यामुळे त्याच्या मागणी मध्ये नेहमीच सातत्य असते .याशिवाय फळे आणि भाजीपाला याच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात मार्जिन देखील आहे. शेतकर्‍यांच्या बाबतीत नेहमी असे होते, की शेतमाल पिकविता येतो परंतु विकता येत नाही .त्यामुळेच शेतमालाचा योग्य तो मोबदला शेतकर्‍यांना मिळत नाही. सध्या विकण्याची देखील संधी आलेली आहे.

नजीकच्या भविष्यात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी या क्षेत्रात निर्माण होतील. या संधीचा वेळीच लाभ घेण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या संधीबद्दल थोडं आणखी साधआणि सरळ सांगण्याची गरज वाटते. थोडक्यात सांगायचे झाल्यास ज्या तरुणांना आपला व्यवसाय उभा करावयाचा आहे. त्यांना फळे आणि भाजीपाला विक्रीची छोटी, मध्यम किंवा मोठ्या आकाराची दुकाने सुरू करण्यासाठी योग्य अशी पार्श्वभूमी कोरोना ने उपलब्ध करून दिली आहे.

ज्याप्रमाणे किराणा आणि इतर कारखानदारी उत्पादनांच्या संदर्भात सुपर शॉपी आणि मॉल संस्कृती उदयास आली आहे त्याच प्रमाणे येत्या काळात फळे आणि भाजीपाला यांचे छोटे-मोठे मॉल त्या त्या परिसराच्या गरजेनुसार निर्माण होतील अशी परिस्थिती आहे. म्हणूनच कोरोनाकडे केवळ संकट म्हणून न पाहता त्याच्याकडे संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे .मध्यमवर्गीयांना हवी असणारी ताजी फळे आणि भाजीपाला स्वच्छ आणि चांगल्या स्वरूपात उपलब्ध झाल्यास सद्यस्थितीत निश्चितच त्याला प्राधान्य दिले जाईल .परंतु यासाठीदेखील आपल्याकडे व्यावसायिक कौशल्य असली पाहिजेत याबद्दल दुमत असू नये.

– प्रा.डॉ मारुती कुसमुडे

- Advertisment -

ताज्या बातम्या