जळगाव | प्रतिनिधी – Jalgaon
धुुुळे येथील फरार आरोपीला जळगावातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ममुराबादच्या बसस्थानकाजवळील लाकडाच्या वखार येथून ताब्यात घेतले.
धुळे कारागृहात शिरपूर येथील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत भादंवि कलम ३०२ आणि धुळे शहर पोलीस ठाण्यातील कलम २२४ नुसार सुरेश घुमान पावरा (वय ४०) हा धुळे सबजेलमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. तो २२ जून रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास कारागृहातून पसार झाला. हा आरोपी ममुराबाद मार्गे जळगावात येणार असल्याची गोपनीय माहिती जळगावातील स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपी सुरेश पावरा याला ममुराबाद येथे ताब्यात घेतले.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक सुधाकर लहारे, हेड कॉन्स्टेबल नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, नाईक परेश महाजन, दीपक शिंदे, प्रवीण हिवाळे यांच्या पथकाने केली.