सौ. वंदना अनिल दिवाणे
27 मे –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शुक्र, चंद्र, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथुन आहे. अतिशय सामर्थ्यवान ग्रहांची चौकट लाभलेली आहे. आयुष्य साहसीपणा, धोके पत्करणे, प्रेम यांनी रंगलेले आहे. त्यामागे प्रबळ इच्छाशक्ती व अटळ निश्चयी वृत्ती उभी असेल. ती चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी हे बुद्धीच्या आकलनबळावर अवलंबून आहे. व्यवस्थापन कौशल्य चांगले असल्यामुळे मोठ्या कंपन्यांच्या संचालनाचे काम चांगले जमेल. व्यापार, उद्योग, आर्थिक उलाढाल यातून प्रचंड धनसंपत्ती प्राप्त होईल. खर्च व हेकेखोरपणा टाळल्यास आर्थिक स्थिती उत्तम राहील.
28 मे –
वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक, रवि, बुध या ग्रहाचा प्रभाव राहील. सूर्य रास मिथून आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, उत्तम गुणांचा जीवनावर आणि करिअरवर प्रभाव पडेल. आत्मविश्वास दांडगा राहील. सृजनशीलता आणि मौलिकता वाखाणण्याजोगी राहील. महत्वाकांक्षाच्या आड येणार्यावर क्रोधाच्या अंगाराचा वर्षाव कराल. योजना मोठमोठ्या असतील. त्याविरुद्ध जाणार्या लोकांची गय करणार नाही. लाथ मारेल तेथे पाणी काढेल अशी वृत्ती असल्यामुळे उत्तम यश मिळेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांची यादिवशीच जयंती असते. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. सढळ हाताने पैसा खर्च कराल.
29 मे –
वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथुन आहे. चंद्राचा प्रभाव राहील. त्यामुळे कल्पनाशक्ती चांगली राहील. कलेकडे कल राहील. आदर्शवाद, गूढशास्त्रे, अध्यात्मामध्ये जास्त रस राहील. साहित्य, कला, संगीत, नाटक यागोष्टीमधे यश मिळवाल. तुमचे घर हे सुंदर वस्तूंचे माहेरघर असेल. अवतीभोवतीचा परिसराचा संवेदनशील स्वभावावर परिणाम करेल. निवासस्थानात अनेक बदल होतील. आर्थिक बाबतीत भाग्याच्या वारूवर मांड ठोकून घोडदौड कराल. कधी कधी उलट परिस्थिती राहील.
30 मे –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, गुरू, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथून आहे. ग्रहांची चौकट चांगली आहे. जीवनात यशस्वी होणे सहज शक्य होईल. महत्वाकांक्षी स्वभावाला मुक्तपणे वाव द्यायला हवा. नेहमी आपल्यापेक्षा उच्च सामाजिक व आर्थिक दर्जा असलेल्या मोठ मोठ्या लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन होणार नाही. आर्थिक स्थितीबाबत तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. मोठमोठ्या संधी स्वतःहून शोधत येतील. लक्ष्मी स्वतः तुमच्या गळ्यात यशाची माळ घालेल.
31 मे –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, शुक्र , बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथुन आहे. जीवनात अनेक अकल्पित घटना घडतील. जीवनपथ इतरांपेक्षा वेगळा असेल. इतरांना अपेक्षित असलेले भौतिक यश कदाचित मिळणार नाही. कारण इतरांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे आवडणार नाही. तरीही यश प्राप्त करालच. आर्थिक स्त्रोत इतरांच्या धनप्राप्तीच्या मार्गांशी मिळता जुळता नसेल. मौलिक आणि अद्भूत आर्थिक आवक चालू राहील.
1 जून –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि बुध, हर्शलयो ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथून आहे. मन अत्यंत दयाळू असून सर्वांविषयी सहानूभूती वाटेल. तुमचा आदर्शवादी अतिशय संवेदनशील स्वभावाचा फायदा घेऊन लबाड लोक तुमची फसवणूक करू शकतात. तुमची महत्त्वाकांक्षा दांडगी असून ती पूर्ण करताना तुम्हाला आनेक अडचणी येतील. एकाच वेळी कमीत कमी दोन करिअरमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. तुमच्या कामात कोणी दखल दिलेली तुम्हाला चालणार नाही. आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. विशेषत: शेअर्स उद्योगाच्या बाबतीतील तुमचे अंदाज अचूक निघण्याची फार शक्यता आहे.
2 जून –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र,नेपच्यून, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथुन आहे. तुमची कल्पनाशक्ती दांडगी असून तुमच्या स्वभावात फार सौम्यपणा असेल. तुम्हाला नवीन विचार, नवीन कल्पना यांचे फार आकर्षण असल्यामुळे तुम्ही त्यांच्या मागोव्याने आपले करिअर निवडाल. जनसामान्यांबद्दल तुमचे विचार फार उदार व सहानुभूतिपूर्वक असतील. तुम्हाला भांडणे, कलह, आक्रमकता यांची घृणा असल्याने तुम्ही इतरांची भांडणे मिटविण्याचा प्रयत्न कराल. पुस्तके, साहित्य व इतिहासाचे वेड राहील. तुमच्या बौद्धिक कार्यात व्यग्र राहिल्याने अर्थप्राप्तीबद्दल उदासीन राहाल.