Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रतापाने दोन मुले हिरावली, आई-वडिलांनी १५ किमीची पायपीट करत मृतदेह खांद्यावर...

तापाने दोन मुले हिरावली, आई-वडिलांनी १५ किमीची पायपीट करत मृतदेह खांद्यावर घेत गाठले घर

आरोग्यसेवेच्या विदारक स्थितीचा व्हिडीओ ट्विट करत वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District) दोन चिमुकल्या भावंडांचा ताप आल्याने मृत्यू (Death) झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. मात्र, या दोघा भावडांना ताप आला आणि त्यानंतर काही तासांच्या अंतराने दोघांचा मृत्यू झाल्याने संशय व्यक्त केला जात आहे. या चिमुकल्या दोन्ही भावंडांना ताप आल्यानंतर उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याऐवजी पुजाऱ्याकडे नेले होते, असेही सांगितले जात आहे. यानंतर आई-वडिलांनी रुग्णालय (Hospital) गाठले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. त्यानंतर वेळेवर शववाहीका उपलब्ध नसल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. दरम्यान, अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेचा व्हिड़ीओ व्हायरल झाल्यानंतर हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ४ सप्टेंबरला रमेश वेलादी यांच्या बाजीरावला (वय ६ वर्षे) ताप आला. पाठोपाठ दिनेश (वय साडेतीन वर्षे) आजारी पडला. यानंतर आई- वडिलांनी त्या दोघानाही पत्तीगाव (Pattigaon) परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी देण्यात आली. मात्र काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. यानंतर आधी बाजीरावचा मृत्यू झाला, त्यानंतर दुपारी दिनेशनेही प्राण सोडले. मात्र, अंतिम उपाय म्हणून पालकांनी नाले-चिखल तुडवत दोघांना जवळच्या जिमलगट्टा आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आरोग्य केंद्रात (Health Center) रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली. पण दोन्ही मुले गमावलेल्या वेलादी दापत्याने सैरभैर होत दोन्ही शव खांद्यावर घेऊन पत्तीगावची वाट धरली. प्राथमिक आरोग्य केंद्रातून परत पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे दोन्ही मुलांचे शव खांद्यावर घेऊन आई- वडिलांवर नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली. त्यानंतर आता या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर ट्विटद्वारे पोस्ट करत निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटले?

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आई-वडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे”, असे ते म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या