नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज झाली आहे. इस्रो कडून पहिल्या मानवी मोहिम लाँच करण्यात येणार असून त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आदित्य एल १ आणि चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेची महत्त्वाची चाचणी या महिन्यात केली जाणार असून या मोहिमेमुळे अंतराळातील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे.
गगनयान ही भारताची पहिलीच अंतराळ मोहीम असून इस्रो २१ ऑक्टोबरला या मोहिमेतील अबॉर्ट मिशन -१ चे प्रक्षेपण करणार आहे. या मोहिमेसाठीच्या पहिल्या क्रू मॉड्यूलची पहिली अबॉर्ट चाचणी या महिन्यात घेतली जाणार आहे. यासाठी इस्रोकडून क्रू एस्केप सिस्टमची अबॉर्ट टेस्ट साठीची तयारी पूर्ण झाली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं की, TV-D1 ची पहिली मानवरहित चाचणी मिशन २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. गगनयान मोहिमेच्या प्रणालीची चाचणी करण्यासाठी आणखी तीन चाचणी TV-D2, TV-D3 आणि TV-D4 करण्यात येतील.
पृथ्वीपासून १७ किमी उंचीवर चाचणी करण्यात येणाऱ्या यानापासून क्रू मॉड्युल वेगळे होण्याची अपेक्षा आहे. या चाचणीत क्रू मॉड्युलचे लॉन्च व्हेईकलद्वारे प्रक्षेपण करण्यात येईल. त्यांनतर ठराविक उंची गाठल्यानतर क्रू मॉड्युल वेगळे होईल आणि समुद्रात लँड होईल. बंगालच्या उपसागरात क्रू मॉड्यूलने टचडाउन केल्यानंतर, भारतीय नौदलाचे जहाज आणि डायव्हिंग टीम वापरून क्रू मॉड्यूल पुन्हा ताब्यात घेईल.