Saturday, November 23, 2024
Homeभविष्यवेध‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा अर्थ

‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा अर्थ

– सौ.वर्षा श्रीनिवास भानप 9420747573

श्री बंकटलाल अग्रवालाकडे येऊन अनेक भक्तांनी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्यातच दोन भजनी दिंड्याही तेथे येऊन भजनात सहभागी झाल्या.दिंडी म्हटले की पांडुरंगाचा नामगजर आलाच. दिंडीतील गायकांचे आवाजही मधुर व तालसुरात होते. भजन किंवा भक्तीगीत भगवंताच्या आवडीसाठी भक्तीमय होऊन गायले की भगवंताशिवाय दुसरे काही आपल्याला डोळ्यांसमोर दिसत नाही. आपण आणि भगवंत एवढाच भाव मनी उरतो. विठ्ठलनामाचा महिमा फार मोठा आहे. एकदा पायी वारी केली की याचा अनुभव आपोआप होईल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. विठ्ठलाचा गजर व विठ्ठलनाम घेत घेत पंढरपुरात केव्हा पोहोचेल व श्रीमुख एकदाचे केव्हा हृदयात साठवेल याचा मनोमन ध्यास लागलेला असतो. या ध्यासापोटी, जिज्ञासे पोटी आपोआप आपल्या मुखात सतत जे शब्द येतात तेच नामस्मरण होय.

- Advertisement -

श्री गजानन महाराजांना नामस्मरण आवडायचे त्यामुळे सतत ते जे गुणगुणत होते तेच आज बीजमंत्र ठरले. गण गण बोते किंवा गणी गण गणांत बोते. हा मंत्र चिंतनकर्त्यास तारक ठरतो. सतत एकाच शब्द समूहांचा उच्चार होत राहिला की त्यास नादमाधुर्य प्राप्त होते. त्यामुळे जीवास आनंद प्राप्त होतो. पुढे हाच नाद नादब्र्ह्माचा अनुभव साधकास न कळत प्राप्त करून देतो, त्यातूनच ते निर्गुण निराकार रुप ज्योती समान आज्ञाचक्रात ध्यानात प्रकट होते. मग ज्याला आपले मन म्हणून आपण संबोधतो ते मन लोप पावते कारण ते ईशतत्वात एकरूप झालेले असते. हेच आत्मरूप होय जे साधकाला ध्यानात सापडते. येथे आपले हृद्य आणि मंत्र हे एकरूप झालेले असतात. मंत्र तोच होऊ शकतो जो स्वामी महाराज गुणगुणत असत , यात आपल्या मनीचे शब्द टाकू नयेत ते बाधक ठरतात आध्यात्मिक प्रगतीसाठी मंत्रसिद्धी ही आत्मसिद्धीत आहे.

महाराजानी सिद्ध केलेला महामंत्र किंवा महाबोध वाक्य आहे-

॥ गण गण गणात बोते ॥

अव्यक्त ब्रह्माचे सगुण रूप म्हणजे हे जगत. जगत हे जर भगवंताचे सगुण रूप आहे तर निर्गुण रूप शोधण्याची माझ्यासारख्या सामान्य भक्ताला गरजच काय उरली? असा हा सुगम मार्ग महाराजांनी या अवतारात आपल्या जीवन चरित्रात ठेऊन सर्व भक्तांना भक्तीचा राजपथ अतिसुगम करून ठेवला आहे. तुम्हाला मला निष्कन्टकपणे या नाम मंत्रातून मुक्ती मिळवता येते. त्यासाठी नव्याने मला काहीच करावे लागत नाही तर विश्वासाने श्रद्धेने या मंत्राचा जप आपल्या रोजच्या साधनेत करायचा आहे.

गण गण गणात बोते ची आध्यत्मिक अर्थ संगती लावताना काही शब्दांचे अर्थ शोधताना जे सापडले ते येथे देण्याचा प्रयत्न साधकांसाठी करीत आहे.

गण: गण या शब्दाऐवजी गण म हा शब्द महाराजांनी स्वीकृत केला आहे. गण म्हणजे महाशक्ती, आदिमाया, आदिसृष्टी, जगदजननी किंवा शक्तीस्वरूपिणी. म्हणजे गणा मुळेच हे जगत प्रकट झाले आहे. अव्यक्त ब्रह्म व्यक्त झाले, आकार रुपात प्रगटले ती आदिशक्ती म्हणजे गण म. जसे विष्णूची वैष्णवी तसेच गणाची शक्ती गण. सर्वप्रथम महाराजांनी हा शब्द याअर्थी वापरला असावा असे वाटते.

गण: ब्रह्म, जो सृष्टीचा आधार परब्रह्म, जो सृष्टीच्या रूपाने आकाराला आला आणि सृष्टीत अंतर्भूत झाला. असा हा ईश्वर पूर्णरूपाने प्रगटला व पूर्णपणे शिल्लक राहिला असा तो ईश्वर. आत्मा, परमात्मा.

गणांत: आत्मा कोठे आहे तर गणात येथे गण हा शब्द म्हणजे शरीराच्या आत जो आहे त्यासाठी म्हणजे आत्म्यासाठी वापरला आहे. गण म्हणजे आत्मा.श्रद्धा व भक्तियुक्त अंत:करणाने चरण दर्शन घेऊन त्याचे ठाई आपली बुद्धी स्थिर ठेऊन या बीजमंत्राचा अर्थ हा चित्तात शोधला की जपाच्या माध्यमाने आपोआप त्याचा अर्थ प्रगट होईल. म्हणून जप करावा व स्वानुभव घ्यावा व समाधानी व्हावे हे उत्तम. तर गणात म्हणजे आत्म्यात.

बोते: हा अनुभवात्मक शब्द असावा. बोते म्हणजे राहत म्हणून चिंतन करा, मनन करा, भजन करा. म्हणजेच सत ईश तत्व जाणून घेतले की समजेल आणि लक्षात येईल की शक्ती व शिव, माया व ब्रह्म म्हणजेच गणी व गणाचे आत्म्याठाई मन:पूर्वक चिंतन होईल एक निश्चित भाव बनेल की हे एकमेकापासून विलग नसून एकच आहेत. त्याठाई अभिन्न भाव निर्माण होईल. महाराजाना येथे हेच सांगावयाचे आहे की जगत म्हणजे जड व चेतन सृष्टी व ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत. हे समजण्यासाठी या बीजमंत्राच्या ध्यानातून हा अर्थ स्पष्ट होऊन ज्ञान प्राप्ती होईल. गोदावरीकाठी राहुनही ज्याला जलाचे ज्ञान नाही तो तहानेने व्याकुळ होणार म्हणून श्री गण ऐवजी गणी शब्दाचा प्रयोग करीत आहेत.

जगत (गण) हे ब्रह्माचे रूप सगुण आहे, गण म्हणजे अव्यक्त ब्रह्म, निर्गुणातून जगतरूपाने ब्रह्म प्रगटले म्हणजे सगुण झाले तेंव्हा परत निर्गुण ईश्वराची पूजां करण्याची आता साधकाला गरज नाही. जे आहे ते डोळ्यासमोर स्पष्ट आहे हे श्री या बिजमंत्रातून टिचक्या वाजवून भक्तांच्या मनावर बिम्बविताना दिसतात. ध्यान भजन रात्रभर त्यादिवशी भक्तांना घडले. सर्वांची मन आनंदाने ओतप्रोत झालीत. असे गण गण भजन हे प्रगट झाले ते विदेही अवस्थेत श्रीना. म्हणून त्यांचे नामकरण भक्तांनी प्रेमपूर्वक गजानन असे केले. आणि त्या दिवसापासून या माहात्म्यास गजानन या नामाने संबोधू लागलेत. शेगावकरांनचे भाग्य थोर म्हणून नामविधीचे भाग्य त्यांना प्राप्त झाले हे नजरेआड करून कसे चालेल? स्वयंमेव ब्रह्माला नामरूप कोठून असणार. योगेश्वर तर सदैव निमग्न रहायचे या आनंददायी चिंतनात.

ब्रह्मपदी पोहोचलेल्या या ज्ञानसुर्यास सर्वत्र समभाव दिसत होता. जातपात, धर्म, भाषा, वंश, भूप्रदेश याची बंधन झुगारून जन कल्याणकारी चरित्र निर्मितीचा हा सन्मार्ग ठेवला की आपल्यालाही मुक्तीचा मार्ग सुस्पष्ट होईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या