सलाबतपूर |वार्ताहर|Salabatpur
नेवासा तालुक्यातील गळनिंब येथे तलवार व कोयत्याने तरुणाची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेत नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या पाचही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
नेवासा तालुक्यातील गळनिंब येथे 27 ऑक्टोबर रोजी रात्री प्रविण सुधाकर डहाळे या 24 वर्षीय तरुणाचा मागील भांडणाच्या कारणावरुन तलवार व कोयता व लोखंडी रॉडने मारहाण करुन खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अशोक ऊर्फ खंडु किसन सतरकर (वय 42), रा. गेवराई ता. नेवासा व ईश्वर नामदेव पठारे (वय 30), रा. वरखेड या दोघांना पथकाने वरखेड येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अन्य आरोपींचा ठावठिकाणा घेतला.
शेखर अशोक सतरकर (वय 23), रा. गेवराई अरुण ऊर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय गणगे (वय 28), रा. सुरेगाव ता. नेवासा व बंडु भिमराव साळवे (वय 32), रा. बाबुर्डीबेंद, ता. नगर यांना ताब्यात घेवून नेवासा पोलीस ठाण्यात हजर केले. नेवासा पोलिसांनी त्यांना अटक करुन रविवारी न्यायालयात हजर केले असता पाचही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे करत आहेत.