अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सार्वजनिक ठिकाणी तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना व खेळविताना कोतवाली पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी एकूण दोन लाख 5 हजार 970 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये रोख रक्कम, तीन मोबाईल व चार दुचाकी यांचा समावेश आहे.
रविवारी (20 जुलै) सायंकाळी 6 वाजता कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार बाळकृष्ण दौंड, सलीम शेख, विशाल दळवी, विनोद बोरगे, अमोल गाडे, अतुल काजळे, महेश पवार, सत्यजीत शिंदे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर हे पोलीस ठाण्यात उपस्थित असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती मिळाली की, सार्थक हॉस्पिटल शेजारी, टी.सी.आय. ट्रान्सपोर्ट गोडाऊन समोर, डॉक्टर कॉलनी, बुरूडगाव रस्ता येथे काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत.
पोलिसांनी तात्काळ पंचासह कारवाई करत सायंकाळी 6.40 वाजता छापा टाकून तान्हाजी गंगाधर रावडी (वय 35), संदीप शरद शिंदे (वय 20), विजय चंद्रभान फुलारी (वय 27), अजय रवींद्र पेटारे (वय 22), किरण लक्ष्मण चाबुकस्वार (वय 52) आणि झाकीर रज्जाक शेख (वय 44) या संशयितांना ताब्यात घेतले. या छाप्यात पाच हजार 970 रूपये रोख रक्कम, तीन मोबाईल, चार दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व संशयित आरोपींविरूध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




